लॉस अँजेलिस : 'स्टार ट्रेक' फिल्म सीरिजमुळे लोकप्रिय झालेला अमेरिकन अभिनेता अँटॉन येल्चिन यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. स्वतःच्याच कारखाली चिरडून अँटॉनचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.


 
27 वर्षीय अँटॉन रिहर्सलसाठी त्याच्या मित्रांची भेट घ्यायला निघाला होता. कार सुरु केल्यानंतर काही कारणास्तव तो बाहेर आला आणि कारच्या मागे उभा राहिला. त्याचवेळी त्याची कार मागे येऊ लागली आणि त्याच्या घराबाहेरील कुंपण तसेच मेलबॉक्सजवळ कारने त्याला चिरडलं.

 
बराच वेळ अँटॉन न आल्यामुळे आणि त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्यामुळे अँटॉनचे मित्र त्याच्या घरी आले, त्यावेळी तो मृतावस्थेत आढळला.

स्टार ट्रेकमध्ये त्याने साकारलेली चेकॉवची भूमिका प्रेक्षकांची दाद मिळवून गेली आहे. 'स्टार ट्रेक बियाँड' हा चित्रपटाच्या सीरीजमधला तिसरा भाग येत्या जुलैमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याच्या तोंडावर एका उमद्या अभिनेत्याच्या मृत्यूमुळे चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.