म्हणून माझ्यावर फसवणुकीचा आरोप, सुझान खानचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 20 Jun 2016 05:27 AM (IST)
मुंबई : माझ्यावर करण्यात आलेले फसवणुकीचे आरोप धादांत खोटे असून माझी प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने केल्याचं स्पष्टीकरण हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानने दिलं आहे. 1.87 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुझानवर पणजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'मी एमजी प्रॉपर्टीज या रिअल इस्टेट फर्मची दिशाभूल करुन आर्किटेक्ट असल्याचं भासवलं आणि कंत्राट उकळलं अशी तक्रार माझ्याविरोधात करण्यात आली आहे. मात्र फसवणुकीचे आरोप धादांत खोटे असून माझी प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने केलेले आहेत. करारातून मी माघार घ्यावी यासाठी माझ्यावर दबाव आणण्यात येत आहे' असं सुझानने म्हटलं आहे. एमजी प्रॉपर्टीज या रिअल इस्टेट फर्मच्या तक्रारीनुसार सुझानने आर्किटेक्ट असल्याचं भासवून कंपनीसोबत करार केल्याचं म्हटलं आहे. एमजी प्रॉपर्टीजचे मॅनेजिंग पार्टनर मुधित गुप्ता यांनी तक्रार दाखल केली आहे. सप्टेंबर 2013 मध्ये कंपनीने तिच्याशी आर्किटेक्चरल आणि डिझायनिंग सेवांसाठी लिखित करार केल्याची माहिती आहे.