Srikanth Official Trailer :  आपल्या अष्टपैलू अभिनयाने सिनेरसिकांना वेड लावणारा अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) पुन्हा एकदा आपला पॉवरपॅक परफॉर्मन्ससह रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे. राजकुमार रावच्या आगामी 'श्रीकांत' (Srikanth Movie) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या चित्रपटात शरद केळकर (Sharad Kelkar) आणि भरत जाधव (Bharat Jadhav) हे महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. उद्योजक श्रीकांत बोला यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट आहे. 


बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट एका दृष्टिहीन मुलाची कथा आहे. जन्मत: अंधत्व असलेला श्रीकांत हा मोठी स्वप्ने पाहतो. इतर सामान्य मुलांच्या तुलनेत श्रीकांत अभ्यासासह इतर गोष्टींमध्येही हुशार आहे. श्रीकांतची स्वप्ने मोठी आहेत. मात्र, त्याच्या या मार्गात शिक्षण व्यवस्था, समाजाचा अंध व्यक्तींबाबत असलेला दृष्टीकोन असे अनेक अडथळे येतात. या अडथळ्यांना श्रीकांत कसा दूर करतो, त्याला कोणाची साथ मिळते, स्वप्न पूर्ण करताना कशी मेहनत घेतो अशा सगळ्या गोष्टींचे चित्रण या चित्रपटात आहे. 


भारतीय शिक्षण व्यवस्थेला कोर्टात खेचणार 


श्रीकांतला बारावीत 98 टक्के गुण मिळाले पण त्याला विज्ञानामध्ये रस असून  पुढील शिक्षण त्यात घ्यायचे आहे.  पण भारतीय शिक्षण व्यवस्थेत दृष्टिहीन मुलांना विज्ञानाचा पर्याय नाही. यानंतर तो भारतीय शिक्षण व्यवस्थेविरुद्ध खटला दाखल करण्याचा निर्णय घेतो. ज्याला भारतात त्याच्या आवडीचा विषय सहज निवडण्याची परवानगी दिली जात नाही, त्याला मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) या जगातील अव्वल महाविद्यालयाने बोलावले. मात्र, हा प्रवासही सोपा नाही आणि त्याला एकट्याला विमानात बसण्याची परवानगीही नाही. मात्र, डॉ. एपीजे अब्दुल कलाम त्यांच्यासाठी मोठा आधार म्हणून येतात. त्यांनी त्याला कशी मदत केली, याचीही गोष्ट पाहता येणार आहे. ट्रेलरवरून चित्रपटाची कथा ही खूपच मनोरंजक आणि हृदयस्पर्शी आणि तितकीच महत्त्वाची दिसून येत आहे.






कधी रिलीज होणार 'श्रीकांत'


या चित्रपटात अभिनेत्री ज्योतिकाची देखील महत्त्वाची भूमिका आहे. त्याशिवाय मराठमोळा अभिनेता शरद केळकर देखील खास भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. तर टी-सीरिजचे भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी यांनी दिग्दर्शन केले आहे. पुढील महिन्यात 10 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.