मुंबई : अभिनय आणि नृत्यानं लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन झालं. कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवी यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांनी अकाली घेतलेली एक्झिट बॉलिवूडसह तमाम चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. श्रीदेवी यांच्या पश्चात पती बोनी कपूर, मुली खुशी आणि जान्हवी असा परिवार आहे.


संयुक्त अरब अमिरातीतील दुबईपासून 45 मिनिटांवर असलेल्या रास अल खैमामध्ये श्रीदेवी सहकुटुंब गेल्या होत्या. पती बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्न समारंभासाठी कपूर कुटुंब तिथे गेलं होतं.

शनिवारी रात्री 11-11.30 वाजताच्या सुमारास कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. यावेळी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी त्यांच्यासोबत दुबईत होते, तर मोठी मुलगी जान्हवी मुंबईत होती.

हॉटेल जुमैरातील स्वतःच्या रुममध्ये असताना श्रीदेवी यांना त्रास जाणवायला लागला. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्या बाथरुममध्येच पडल्या. हॉस्पिटमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं.

पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार

श्रीदेवी यांचं पार्थिव दुबईतील पोलिस हेडक्वॉर्टरजवळ असलेल्या शवागरात ठेवण्यात आलं आहे. सोनापूरमध्ये त्यांच्या पार्थिवाचं पोस्टमार्टम करण्यात येईल. श्रीदेवींच्या पार्थिवाला लेपन करण्यात येईल.

मुंबईहून एक चार्टर्ड प्लेन दुबईला जाईल. दुबईहून रात्री आठ वाजता हे विमान पुन्हा मुंबईसाठी निघेल. मुंबईत रात्री 11 वाजण्याच्या सुमारास श्रीदेवी यांचं पार्थिव दाखल होण्याची शक्यता आहे.

मुंबईत अंधेरीतील बंगल्यात अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात येईल. उद्या (सोमवारी) सकाळी श्रीदेवी यांच्या पार्थिवावर सांताक्रुझमध्ये अंत्यसंस्कार होतील.

मान्यवरांची आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही श्रीदेवी यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.






पहिली सुपरस्टार अभिनेत्री

श्रीदेवी यांना बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार मानलं जातं. श्री अम्मा यंगर अय्यपन म्हणजेच श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटातही अभिनय केला आहे.

वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी थुनैवन या तामिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून सुरुवात केली. 1971 मध्ये वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी त्यांना पुम्बाता या मल्ल्याळम चित्रपटासाठी केरळचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

1975 मध्ये ज्युली या बॉलिवूडपटातून श्रीदेवींनी बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. त्या चित्रपटात नायिका लक्ष्मीच्या धाकट्या बहिणीची भूमिका श्रीदेवी यांनी रंगवली होती.

वयाच्या 13 व्या वर्षी मूंद्रू मुदिचू (1976) हा श्रीदेवींनी केलेला तामिळ चित्रपट प्रौढ कलाकार म्हणून पहिला सिनेमा मानला जातो. 1979 मध्ये प्रदर्शित झालेला सोलवा सावन हा श्रीदेवी यांचा पहिला बॉलिवूडपट ठरला.

हिम्मतवाला, सदमामुळे यशोशिखरावर

श्रीदेवी यांच्या नावाचा खरा गवगवा झाला तो 1983 साली प्रदर्शित झालेल्या हिम्मतवाला चित्रपटानं. जीतेंद्र आणि श्रीदेवी या जोडीनं मग मवाली, मकसद, जस्टिस चौधरी असे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले.

कमल हासनसोबतच्या सदमा या चित्रपटातल्या श्रीदेवी यांच्या अभिनयाला समीक्षकांकडून कौतुकाची पावती मिळाली. मग चांदनी, लम्हे, मिस्टर इंडिया, खुदा गवाह, नगिना, चालबाज यासारख्या चित्रपटांमधल्या भूमिकांनी हिंदी चित्रपटांच्या दुनियेत त्यांचं एक वेगळं वलय निर्माण झालं. मिस्टर इंडिया या चित्रपटातल्या एका नृत्यानं त्यांना मिस हवाहवाई हे टोपणनाव मिळवून दिलं होतं.

मिथुन चक्रवर्तीशी विवाह

श्रीदेवी यांनी ऐन भरात असताना मिथुन चक्रवर्तीशी केलेला पहिला विवाह अवघी तीन वर्षे टिकला. त्या दोघांनी 1988 साली घटस्फोट घेतला. त्यानंतर श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्यात जवळीक निर्माण झाली. 1996 साली त्या दोघांनी लग्न केलं. हे बोनी यांचं दुसरं लग्न होतं.

1997 साली केलेल्या जुदाई चित्रपटानंतर श्रीदेवी यांनी जवळपास 15 वर्षांचा मोठा ब्रेक घेतला.

15 वर्षांनी पुनरागमन

2012 मध्ये गौरी शिंदे दिग्दर्शित इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून श्रीदेवींनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. या चित्रपटातून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. 2017 मध्ये प्रदर्शित झालेला 'मॉम' हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी श्रीदेवी यांना 2013 साली 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

गेल्याच वर्षी श्रीदेवी यांच्या चित्रपट कारकीर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली. 'मॉम' हा त्यांचा तीनशेवा चित्रपट अखेरचा ठरला. शाहरुख खानच्या आगामी 'झिरो' चित्रपटाचं शूटिंग त्या करत होत्या.

रिअल लाईफमधला दीर, अभिनेते अनिल कपूर यांच्यासोबत त्यांनी साकारलेल्या अनेक चित्रपटातील भूमिका गाजल्या. श्रीदेवी यांच्या बहुतांश यशस्वी चित्रपटांची निर्मिती पती बोनी कपूर यांनी केली आहे. अभिनेते संजय कपूरही त्यांचे दीर आहेत.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी करण जोहर दिग्दर्शित 'धडक' चित्रपटातून पदार्पण करणार होती. मात्र लेकीचा पहिला चित्रपट पाहण्यापूर्वीच त्यांनी निरोप घेतला.

गाजलेले चित्रपट

1983- सदमा
1983- हिम्मतवाला
1983- जस्टिस चौधरी
1983- मवाली
1983- कलाकार
1984- तोहफा
1986- नगिना
1986- आग और शोला
1986- कर्मा
1986- सुहागन
1987 - औलाद
1987 - मिस्टर इंडिया
1989 - निगाहे (नगिना भाग 2)
1989 - चांदनी
1989 - चालबाज (सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर)
1991 - फरिश्ते
1991 - लम्हे (सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर)
1992 - खुदा गवाह
1992 - हीर रांझा
1993 - रुप की रानी चोरों का राजा
1993 - गुमराह
1993 - चंद्रमुखी
1994 - लाडला
1997 - जुदाई

2004 - सहारा वन चॅनलवर मालिनी अय्यर या दैनंदिन मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री

2012 - इंग्लिश विंग्लिश
2017 - मॉम

संबंधित बातम्या:


'रुप की रानी' श्रीदेवी यांची कारकीर्द


लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट


दुबईतील लग्नसोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे फोटो