मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक पॅपोन याच्या विरोधात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगात तक्रार दाखल झाली आहे. पॅपोनने लहान मुलांसोबत होळी सेलिब्रेशनचं फेसबुक लाईव्ह केलं होतं, ज्यामध्ये तो एका मुलीला किस करताना दिसत आहे. यानंतर आता काहींनी त्याचा बचाव केला आहे, तर त्याच्याविरोधात काहींनी संताप व्यक्त केला आहे. यावर आता स्वतः पॅपोननेही स्पष्टीकरण दिलं आहे.


''सध्या माझ्याबाबत जी काही चर्चा सुरु आहे, ते पाहून अत्यंत त्रास होत आहे. जे कुणी मला ओळखतात, त्यांना माहित आहे, की मी अत्यंत सहज आणि फ्री व्यक्ती आहे. माझ्या फेसबुकवरचा व्हिडीओ पुन्हा एकदा पाहा आणि विचार करा की जर काही चुकीचं असतं तर मी स्वतःच तो व्हिडीओ का प्रमोट केला असता?

माझी प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे, की यामध्ये जे सहभागी आहेत, त्यांच्यावर या सर्व प्रकरणाचा काय परिणाम होईल, याचा जरा विचार करा. माझी बायको आणि दोन लहान मुलं आहेत. यामध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे, जिची ओळख व्हिडीओमधून स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकारामुळे आमचे दोघांचेही कुटुंब उद्ध्वस्त होतील,'' असं स्पष्टीकरण पॅपोनने एका पत्रकाद्वारे दिलं आहे.


काहीही चुकी नसताना मला गुन्हेगारासारखं ग्रहीत धरलं जात आहे. मात्र या कठीण वेळेतही माझं कुटुंब माझ्या मागे उभं आहे, असंही पुढे त्याने म्हटलं आहे.

दरम्यान, पॅपोनने काहीही चुकीचं केलं नसल्याचं संबंधित मुलीने म्हटलं आहे. होळी स्पेशल एपिसोडनंतर सर्वांनी होळीचं सेलिब्रेशन केलं आणि त्याचं फेसबुक लाईव्ह केलं होतं. पॅपोन सरांनी जे केलं, ते आपले आई-वडिलही करतात. त्याचा चुकीचा अर्थ काढू नये, असं आवाहन संबंधित मुलीने केलं आहे.