मुंबई : श्रीदेवी... हृदयातील प्रत्येक भावना टपोऱ्या डोळ्यांमधून व्यक्त करणारी  रुपवती. अतिशय बोलके डोळे, घायाळ करणारं सौंदर्य, भूमिका जिवंत करणारा अभिनय आणि या सर्वांना एकत्रित गुंफणारी नृत्यकला. श्रीदेवीनं जितक्या सहजतेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, तितक्याच सहजतेनं आणि अकस्मितपणे तिनं जगाचा कायमचा निरोप घेत आपल्याला आयुष्यभराचा चटका लावला.


LIVE UPDATE :

4:33 PM : श्रीदेवी यांना हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर त्या थेट बाथटबमध्ये पडल्या आणि तिथेच बुडून त्यांचा मृत्यू झाला, शवविच्छेदन अहवालातून नवी माहिती समोर

03:25 PM: श्रीदेवींचं पार्थिव दुबईहून मुंबईला येण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता, शवविच्छेदन रिपोर्ट मिळाल्यानंतर 8 तासांनी पार्थिव मुंबईला पोहचणार

02:10 PM: सुत्रांच्या माहितीनुसार, श्रीदेवीच्या शरीरात कोणताही विषाचा अंश सापडला नाही, मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानेच

01:06 PM: बोनी कपूर 21 फेब्रुवारीला मनमोहन शेट्टीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मुंबईत आला होता. त्यानंतर तो 24 फेब्रुवारीला पुन्हा दुबईला रवाना झाला.



12:50 PM: बहुदा आज श्रीदेवी यांचं पार्थिव मुंबईत पोहचू शकत नाही. कारण की, दुबईमध्ये शासकीय कार्यालयं दुपारी साडेचार वाजेपर्यंतच सुरु असतात. तसंच श्रीदेवी यांच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट अद्यापही आलेला नाही.

11: 45 AM: दुबईत पोलीस आणि शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीनंतरच मृत्यूचा दाखला देण्यात येईल. त्यानंतर त्यांचं पार्थिव एअरपोर्टला आणलं जाईल.

10: 45 AM: श्रीदेवीच्या रक्ताचे आणि शरीरातील काही अवयवांचे रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे. त्यामुळे त्याचं पार्थिव मुंबईत येण्यास उशीर होत आहे.

10: 30 AM: दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, पती बोनी कपूर मुंबईत परतल्यानंतर श्रीदेवी दुबईतील हॉटेलमध्ये एकटीच होती. मृत्यूच्या 48 तास आधी ती हॉटेलमधून बाहेर पडली नव्हती. याप्रकरणी दुबई पोलिसांनी हॉटेलचा संपूर्ण मजला सील केला आहे. कारण की, त्यांना आवश्यक तो तपास करता यावा.

09: 06 AM: श्रीदेवी यांचं पार्थिव आज दुपारपर्यंत दुबईहून मुंबईत आणलं जाईल. त्यामुळे त्यांची शेवटची झलक पाहण्यासाठी त्यांच्या घराबाहेर त्यांच्या चाहत्यांनी सकाळपासूनच प्रचंड गर्दी केली आहे. 

09: 05 AM:  'श्रीदेवी या आमच्या कायम स्मरणात राहतील. त्या आता या जगात राहिल्या नाहीत हे बोलणंही फार अवघड वाटतं. आम्ही देशातील एक मोठी अभिनेत्री गमावली आहे. मला यावर अद्यापही विश्वास बसत नाही.' अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी दिली.


- श्रीदेवी यांचं पार्थिव मुंबईतील वर्सोवा येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यामुळे त्यांच्या बंगल्याबाहेर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

परवा (24 फेब्रुवारी) रात्री संयुक्त अरब अमिरातमधल्या अबुधाबीत कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवीला आपल्यापासून कायमच हिरावून घेतलं. अवघ्या 54 व्या वर्षी तिनं चाहत्यांना कायमचं पोरकं केलं. भाच्याच्या लग्नासाठी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसोबत श्रीदेवी दुबईमध्ये होत्या.

श्रीदेवी यांचं पार्थिव आज मुंबईत आणलं जाणार आहे. दुबईतलं कार्यालय संध्याकाळी बंद झाल्यानं पुढील प्रक्रिया पार पडणं बाकी आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पोलिस रिपोर्ट देतील आणि त्यानंतर पार्थिव मुंबईत आणलं जाईल.

श्रीदेवी यांचं पार्थिव मुंबईत आणण्यासाठी उद्योगपती अनिल अंबानी यांचं चार्टर्ड प्लेन दुबईला रवाना झाले आहे. 13 सीट्सचं हे खासगी चार्टर्ड प्लेन आहे.

मुंबईत अंधेरीतील बंगल्यात अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात येईल. त्यानंतर श्रीदेवी यांच्या पार्थिवावर सांताक्रुझमध्ये अंत्यसंस्कार होतील.

पहिली सुपरस्टार अभिनेत्री

श्रीदेवी यांना बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार मानलं जातं. श्री अम्मा यंगर अय्यपन म्हणजेच श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटातही अभिनय केला आहे.

वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी थुनैवन या तामिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून सुरुवात केली. 1971 मध्ये वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी त्यांना पुम्बाता या मल्ल्याळम चित्रपटासाठी केरळचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

1975 मध्ये ज्युली या बॉलिवूडपटातून श्रीदेवींनी बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. त्या चित्रपटात नायिका लक्ष्मीच्या धाकट्या बहिणीची भूमिका श्रीदेवी यांनी रंगवली होती.

वयाच्या 13 व्या वर्षी मूंद्रू मुदिचू (1976) हा श्रीदेवींनी केलेला तामिळ चित्रपट प्रौढ कलाकार म्हणून पहिला सिनेमा मानला जातो. 1979 मध्ये प्रदर्शित झालेला सोलवा सावन हा श्रीदेवी यांचा पहिला बॉलिवूडपट ठरला.

हिम्मतवाला, सदमामुळे यशोशिखरावर

श्रीदेवी यांच्या नावाचा खरा गवगवा झाला तो 1983 साली प्रदर्शित झालेल्या हिम्मतवाला चित्रपटानं. जीतेंद्र आणि श्रीदेवी या जोडीनं मग मवाली, मकसद, जस्टिस चौधरी असे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले.

कमल हासनसोबतच्या सदमा या चित्रपटातल्या श्रीदेवी यांच्या अभिनयाला समीक्षकांकडून कौतुकाची पावती मिळाली. मग चांदनी, लम्हे, मिस्टर इंडिया, खुदा गवाह, नगिना, चालबाज यासारख्या चित्रपटांमधल्या भूमिकांनी हिंदी चित्रपटांच्या दुनियेत त्यांचं एक वेगळं वलय निर्माण झालं. मिस्टर इंडिया या चित्रपटातल्या एका नृत्यानं त्यांना मिस हवाहवाई हे टोपणनाव मिळवून दिलं होतं.

मिथुन चक्रवर्तीशी विवाह

श्रीदेवी यांनी ऐन भरात असताना मिथुन चक्रवर्तीशी केलेला पहिला विवाह अवघी तीन वर्षे टिकला. त्या दोघांनी 1988 साली घटस्फोट घेतला. त्यानंतर श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्यात जवळीक निर्माण झाली. 1996 साली त्या दोघांनी लग्न केलं. हे बोनी यांचं दुसरं लग्न होतं.

1997 साली केलेल्या जुदाई चित्रपटानंतर श्रीदेवी यांनी जवळपास 15 वर्षांचा मोठा ब्रेक घेतला.

15 वर्षांनी पुनरागमन

2012 मध्ये गौरी शिंदे दिग्दर्शित इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून श्रीदेवींनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. या चित्रपटातून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. 2017 मध्ये प्रदर्शित झालेला 'मॉम' हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी श्रीदेवी यांना 2013 साली 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

गेल्याच वर्षी श्रीदेवी यांच्या चित्रपट कारकीर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली. 'मॉम' हा त्यांचा तीनशेवा चित्रपट अखेरचा ठरला. शाहरुख खानच्या आगामी 'झिरो' चित्रपटाचं शूटिंग त्या करत होत्या.

रिअल लाईफमधला दीर, अभिनेते अनिल कपूर यांच्यासोबत त्यांनी साकारलेल्या अनेक चित्रपटातील भूमिका गाजल्या. श्रीदेवी यांच्या बहुतांश यशस्वी चित्रपटांची निर्मिती पती बोनी कपूर यांनी केली आहे. अभिनेते संजय कपूरही त्यांचे दीर आहेत.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी करण जोहर दिग्दर्शित 'धडक' चित्रपटातून पदार्पण करणार होती. मात्र लेकीचा पहिला चित्रपट पाहण्यापूर्वीच त्यांनी निरोप घेतला.

गाजलेले चित्रपट
1983- सदमा
1983- हिम्मतवाला
1983- जस्टिस चौधरी
1983- मवाली
1983- कलाकार
1984- तोहफा
1986- नगिना
1986- आग और शोला
1986- कर्मा
1986- सुहागन
1987 - औलाद
1987 - मिस्टर इंडिया
1989 - निगाहे (नगिना भाग 2)
1989 - चांदनी
1989 - चालबाज (सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर)
1991 - फरिश्ते
1991 - लम्हे (सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर)
1992 - खुदा गवाह
1992 - हीर रांझा
1993 - रुप की रानी चोरों का राजा
1993 - गुमराह
1993 - चंद्रमुखी
1994 - लाडला
1997 - जुदाई
2004 - सहारा वन चॅनलवर मालिनी अय्यर या दैनंदिन मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री
2012 - इंग्लिश विंग्लिश
2017 - मॉम