Sridevi Birthday : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आज जरी या जगात नसली, तरी ती चाहत्यांच्या हृदयात नेहमीच जिवंत राहिली आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला होता. आपल्या यशस्वी कारकिर्दीत श्रीदेवीने हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि प्रेक्षकांच्या हृदयात आपली हक्काची जागा निर्माण केली.


श्रीदेवीचे खरे नाव ‘श्री अम्मा यंगर अय्यपन’ आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली लेडी सुपरस्टार म्हटल्या जाणार्‍या श्रीदेवीने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून 'कंधन करुणाई' या तमिळ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1971मध्ये प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपट ‘पूमबट्टा’साठी श्रीदेवीला केरळ राज्य चित्रपट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. या काळात श्रीदेवीने अनेक तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले.


अभिनेत्रीचे बॉलिवूड पदार्पण


‘रानी मेरा नाम’ या 1972मध्ये आलेल्या चित्रपटाद्वारे श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात श्रीदेवीला प्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. 1979मध्ये आलेल्या 'सोलहवा सावन' या चित्रपटातून श्रीदेवीने मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. श्रीदेवीला खरी ओळख ‘हिम्मतवाला’ या चित्रपटातून मिळाली होती. या चित्रपटात श्रीदेवी अभिनेता जितेंद्रसोबत मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटातील श्रीदेवीच्या अभिनयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटासोबतच श्रीदेवीचे नाव बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये सामील झाले. श्रीदेवीने आपल्या चित्रपटांमध्ये काम करावे, म्हणून अनेक निर्माते-दिग्दर्शक रांगा लावायचे.


मिथुन चक्रवर्तीशी लग्न अन् बोनी कपूर-श्रीदेवीची प्रेमकथा


एक काळ असा होता की बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर आणि श्रीदेवी यांच्यात घट्ट मैत्री होती. इतकेच नाही तर, संघर्षाच्या काळात मोनाने श्रीदेवीला तिच्या घरात राहण्यासाठी जागाही दिली. यादरम्यान श्रीदेवी अभिनेता मिथुन चक्रवर्तीला डेट करत होती. श्रीदेवीने 1985मध्ये मिथुनसोबत गुपचूप लग्न केल्याचेही बोलले जाते. त्यावेळी मिथुनला असे वाटले की, बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्यात काहीतरी सुरू आहे. याचमुळे श्रीदेवीने बोनी कपूर यांना राखी बांधली होती, हे बोनी यांची पहिली पत्नी मोना कपूरनेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. मोनाने सांगितले होते की, मिथुनला तिच्या प्रेमाची खात्री पटवून देण्यासाठी श्रीदेवीने बोनीला राखी बांधली होती. बॉलिवूडमध्ये मिथुन आणि श्रीदेवीचे किस्से रोज चर्चेत राहू लागले. मिथुनची पत्नी गीता बाली यांना जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांनी मिथुनला धमकी दिली. त्यानंतर 1988मध्ये श्रीदेवी आणि मिथुन वेगळे झाले.


बोनी कपूर यांच्याशी बांधली लग्नगाठ


‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटादरम्यान श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यात जवळीक वाढू लागली होती. मात्र, दोघांमध्ये भाव-बहिणीचे नाते असल्याने बोनी कपूर यांच्या पत्नी देखील गाफील राहिल्या. मात्र, जेव्हा श्रीदेवी गर्भवती आहे आणि या बाळाचे पिता बोनी कपूर आहेत, हे कळले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन, श्रीदेवीशी लग्न केले.


हेही वाचा :


Sridevi And Jaya Prada : एकत्र आठ चित्रपट, पण तरीही अबोला; श्रीदेवी आणि जया प्रदा यांच्यातील वाद नेमका काय?


25 Years Of Judaai : श्रीदेवीसोबत काम करायचे नव्हते, अनिल कपूरने ‘जुदाई’साठी दिला होता नकार! वाचा किस्सा...