मुंबई : दक्षिण भारतातील सुपरस्टार राम चरण हा टॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. चित्रपटांशिवाय तो अनेक ब्रॅण्डच्या जाहिराती आणि खासगी गुंतवणुकीतून बराच पैसा कमावतो.
आता असं वृत्त आहे की, राम चरणने हैदराबामधील जुबली हिल्सच्या प्राईम लोकेशनमध्ये नवं भव्य घर खरेदी केलं आहे. या घराची किंमत तब्बल 38 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. दक्षिण भारतामधील कोणत्याही सेलिब्रिटीच्या घरांपेक्षा हे घर महागडं आहे. राम चरणची एकूण कमाई 1300 कोटी रुपये आहे.
38 कोटींच्या घराशिवाय राम चरण हा अनेक आलिशान कारचा मालक आहे. अनेक लेटेस्ट गाड्यांचं कलेक्शन त्याच्याकडे आहे. बीएमडब्लू 7 सीरिज (किंमत : 1 कोटी 32 लाख), मर्सिडीज बेन्झ एस क्लास (किंमत : 2 कोटी 73 लाख), रेंज रोव्हर वोग (किंमत : 3 कोटी 50 लाख), अॅस्टर मार्टिन (किंमत : 5 कोटी 80 लाख) या महागड्या कार त्याच्या गॅरेजमध्ये आहेत.
राम चरण हा सर्वाधिक मानधान स्वीकारणारा दाक्षिणात्य अभिनेता आहे. एका सिनेमासाठी तो तब्बल 12 ते 15 कोटी रुपये आकारतो. राम चरण हा अभिनेता चिरंजीवी यांचा मुलगा असून त्याने 2007 मध्ये सिनेकारकीर्दीची सुरुवात केली. पदार्पणाच्या चित्रपटातच त्याला नाव आणि प्रसिद्धी मिळाली. बोयापती श्रीनू दिग्दर्शित 'विनया विधेया रामा' हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. मात्र तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
राम चरणचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊसही आहे. कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी असं त्याचं नाव आहे. कोनिडेला प्रॉडक्शन कंपनीच्या पुढील चित्रपटात त्याचे वडील चिरंजीवी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तेलुगू, तामीळ आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं बजेट सुमारे 150 कोटी रुपये आहे. या चित्रपटात जगपती बाबू, नयनतारा आणि विजय सेतुपती हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
राम चरण लवकरच एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर'मध्ये ज्युनिअर एनटीआरसोबत झळकणार आहे. या सिनेमासाठी 300 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 2020 च्या मकरसंक्रांतीला चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यत आहे. चाहत्यांना या सिनेमाकडून जास्त अपेक्षा आहेत, कारण राजामौली यांनी याआधी 'बाहुबली' आणि 'मगधीरा' यांसारखे चित्रपट बनवले आहेत.