मुंबई : मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेता विद्युत जामवालसोबत 'जंगली' सिनेमातून पूजा हिंदी सिनेसृष्टीत एन्ट्री करत आहे.


'जंगली' चित्रपटाचा टीझर काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. मात्र त्यात पूजाची झलक न दिसल्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या लूकबाबत उत्सुकता आहे. चक रसेल यांच्याकडे सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आहे. 5 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

पूजा सावंत 2008 साली 'मटा श्रावणक्वीन' या स्पर्धेची विजेती ठरली होती. त्यानंतर 2010 मध्ये पूजाने 'क्षणभर विश्रांती' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर पोष्टर बॉईज, नीळकंठ मास्टर, दगडी चाळ, भेटली तू पुन्हा अशा अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली.

पूजा 'एकापेक्षा एक जोडीचा मामला' या रिअॅलिटी शोमध्ये वैभव तत्त्ववादीसोबत झळकली होती. तर 'जल्लोष सुवर्णयुगाचा' या स्पर्धेची ती विजेतीही ठरली होती.

यापूर्वी अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, वैभव तत्त्ववादी, सिद्धार्थ जाधव, सौरभ आणि अनुजा गोखले यासारखे मराठी सिनेविश्व गाजवणारे अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये झळकले आहेत. पूजाच्या रुपाने आणखी एक नाव हिंदी पडदा व्यापून टाकण्यास सज्ज झालं आहे.