Box Office : 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) आणि 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) बॉलिवूडला तारणार? सध्या हाच प्रश्न बॉलिवूडमध्ये विचारला जाऊ लागला आहे. आणि याचं कारण आहे गेल्या काही महिन्यांपासून बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप होणारे बिग बजेट हिंदी सिनेमे. तर दुसरीकडे दक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींच्या उड्या मारू लागलेत. हिंदी चित्रपटसृष्टीवर दक्षिणेतील सिनेमांचं आक्रमण होत असताना मोठं वादळ घोंघावत असताना 'ब्रह्मास्त्र' आणि 'विक्रम वेधा' काहीशी आशा घेऊन समोर येत आहेत. चांगला कंटेंट असेल तर प्रेक्षक त्याला डोक्यावर घेतातच. 'ब्रह्मास्त्र' आणि 'विक्रम वेधा'चा कंटेंट चांगला दिसत आहे. त्यामुळेच हे दोन्ही सिनेमे बॉलिवूडला तारणार का? असा प्रश्न सध्या पडत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक निर्मात्यांनी त्यांचे सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. यात अनेक बिग बजेट सिनेमांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूड सिनेमांसह अनेक दाक्षिणात्य सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड सिनेमे आपली जादू दाखवण्यात कमी पडले. पण दाक्षिणात्य सिनेमांनी मात्र चांगला गल्ला जमवला आहे.
'ब्रम्हास्त्र' आणि 'विक्रम वेधा' हे बिग बजेट सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे आता हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी होतील की सुपरफ्लॉप ठरतील याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 'ब्रम्हास्त्र' आणि 'विक्रम वेधा' या दोन्ही सिनेमांचं कथानक चांगलं असल्याचा अंदाज बांधला जात आहे. 'ब्रम्हास्त्र'ने रिलीजआधीच रेकॉर्डब्रेक कमाई केली असल्याचंदेखील म्हटलं जात आहे. त्यामुळे आता कोणता सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो हे पाहावं लागेल.
दाक्षिणात्य सिनेमांची हवा
प्रभासच्या बाहुबलीपासून भारतात दाक्षिणात्य सिनेमांचे सुगीचे दिवस सुरू झाले. त्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले सर्व दाक्षिणात्य सिनेमे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या पुष्पा, केजीएफ 2, कार्तिकेय 2 या सिनेमांनी सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. अजूनही दाक्षिणात्य सिनेमांची झंझावत कायम आहे.
हॅशटॅग बॉयकॉटचा फायदा दाक्षिणात्य सिनेमांना
गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होणाऱ्या सर्वच सिनेमांना नेटकऱ्यांनी बॉयकॉट केलं आहे. याचाच फायदा दाक्षिणात्य सिनेमांना होत आहे. कोणताही बॉलिवूड सिनेमा आला की तो कोणत्या ना कोणत्या कारणाने हॅशटॅग बॉयकॉट होत आहे. सिनेमे बॉयकॉट होत असल्याने प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्यापेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सिनेमांना पसंती दर्शवताना दिसत आहे.
संबंधित बातम्या