मुंबई : 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातील एका संवादावर दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थनं आक्षेप घेतला आहे. सेन्सॉर बोर्डनेही चित्रपटातील काही दृश्य आणि संवादांवर आक्षेप घेतला होता.


'ठाकरे' चित्रपटाचा मराठी आणि हिंदी भाषेतील ट्रेलर मोठ्या थाटात काल प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थला सिनेमातील ‘उठाओ लुंगी, बजाओ पुंगी’ हा संवाद काहीसा खटकला आहे. सिद्धार्थने या संवादाबाबत उघड नाराजी ट्विटरवर व्यक्त केली.





शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाक्षिणात्यांविरोधात मोठं आंदोलन उभं केलं होतं, हे चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. याविषयी सिद्धार्थने ट्वीट करत म्हटलं की, ‘उठाओ लुंगी, बजाओ पुंगी’ हा संवाद दाक्षिणात्य जनतेविरोधात आहे. हा संवाद दक्षिण भारतीय जनतेविरोधात द्वेष पसरवणारा आहे. अशा चित्रपटाला पसंती देणार का? असा प्रश्न सिद्धार्थने जनतेला विचारला.





सेन्सॉर बोर्डानेही सिनेमातील तीन संवाद आणि काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. बाळासाहेबांच्या शिवराळ भाषेतील भाषणांचा चित्रपटात समावेश आहे. तसेच वादग्रस्त बाबरी मशिद प्रकरणीही काही दृश्य सिनेमात दाखवण्यात आली आहेत. बाबरी मशिद प्ररकणातील या दृश्यांमुळे आगामी काळात वाद निर्माण होऊ शकतो. हा वाद निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून म्हणून सेन्सॉर बोर्डानं या आशयाच्या काही दृश्यांवर आक्षेप घेतल्याची माहिती सूत्रांककडून मिळत आहे.


संबंधित बातम्या


'ठाकरे' व्यतिरिक्त कोणताही सिनेमा रिलीज होऊ देणार नाही : बाळा लोकरे


'छातीत नाही, खरी ताकत माणसाच्या मेंदूत असते', 'ठाकरे'त दणकेबाज संवादांची पर्वणी


बहुचर्चित ठाकरे चित्रपटाचा दमदार ट्रेलर लॉन्च


'ठाकरे' सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात