मुंबई : बहुचर्चित, बहुप्रतीक्षित 'ठाकरे' सिनेमाचा ट्रेलर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत काल प्रदर्शित झाला. ठाकरे सिनेमाच्या ट्रेलरनंतर आता शिवसेनेचे चित्रपट सेना सरचिटणीस बाळा लोकरे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.
येत्या 25 जानेवारीला 'ठाकरे' सिनेमाव्यतिरिक्त कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा धमकी वजा इशारा बाळा लोकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला आहे. लोकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, 'ठाकरे' सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या दिवशी इतर कोणताही चित्रपट आम्ही चालू देणार नाही. जर कुणी इतर चित्रपट प्रदर्शित करणार असेल तर त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असल्याने बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांची ही इच्छा असल्याने आम्ही यावर ठाम आहोत, असं बाळा लोकरे यांनी सांगितलं.
संजय राऊतांचं स्पष्टीकरण
'ठाकरे' व्यतिरिक्त 25 जानेवारीला दुसरा कोणताही चित्रपट रिलीज होऊ देणार नाही, ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. लोक उत्साहाने, प्रेमाने मत व्यक्त करत आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
'ठाकरे' सिनेमाचा हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये हे ट्रेलर रिलीज झाले असून हिंदीच्या तुलनेत मराठीतील ट्रेलरमध्ये बेधडक संवादांनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मराठी ट्रेलरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील अप्रत्यक्ष तोफ डागली आहे. 'माणसाची छाती किती इंचाची आहे यावर माणसाची ताकत कळत नसते, खरी ताकत माणसाच्या मेंदूत असते.' अशा शब्दात मोदींवर सरळ टीका केली आहे.
मराठी चित्रपटाला थिएटर मिळण्यासंबंधी मुद्द्याचाही हिंदी ट्रेलरमध्ये समावेश केला आहे. विशेष म्हणजे हिंदी ट्रेलरमध्ये एका दृश्यात उध्दव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांचं पात्र देखील दिसत आहे. ट्रेलर दोन्ही भाषेत रिलीज करण्यात आला असून त्यामधील दृश्य आणि संवाद वेगळे आहेत.
हिंदी चित्रपटात नवाजुद्दीनचाच आवाज ठेवण्यात आला असून मराठीसाठी अभिनेते सचिन खेडेकर यांचा आवाज वापरण्यात आला आहे. हिंदीसहित मराठी ट्रेलरमध्येही दमदार संवाद ऐकायला मिळत आहेत. अभिनेता नवाजुद्दीन बाळासाहेबांची तर अमृता रावने बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची भूमिका निभावली आहे.
खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राऊत यांनीच पटकथा लिहिली असून अभिजीत पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 25 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
'छातीत नाही, खरी ताकत माणसाच्या मेंदूत असते', 'ठाकरे'त दणकेबाज संवादांची पर्वणी
बहुचर्चित ठाकरे चित्रपटाचा दमदार ट्रेलर लॉन्च