Superstar Mammootty :  एखादा कलाकार किती यशस्वी आहे, हे त्याच्या हिट चित्रपटांवरून ठरवले जाते. त्यातही सध्या एखाद्या अभिनेत्याच्या नावावर 100 कोटींची कमाई करणारे किती चित्रपट आहेत, यावरून त्या अभिनेत्याच्या सुपरस्टारपदाचे मोजमाप केले जाते. बॉलिवूडपासून दक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या चित्रपटांनी फक्त 100 कोटीच नव्हे तर 200, 300, 500 आणि 1000 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या यादीत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), सलमान खान (Salman Khan), रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रजनीकांत (Rajinikanth) प्रभासपासून ते अल्लू अर्जुनपर्यंत अनेक स्टार्सचा समावेश आहे. पण एका अभिनेत्याने 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले पण त्याच्या एकाही चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमवला नाही. तरीही हा अभिनेता सुपरस्टार आहे. 


या अभिनेत्याने अभिनय क्षेत्रात येण्यासाठी आपली वकिली सोडली. पहिला ब्रेक मिळवण्यासाठी या अभिनेत्याच्या वाटेला संघर्ष आला. पहिल्या चित्रपटासाठी कोणतेही मानधन घेतले नाही. मात्र, आज त्या अभिनेत्याची गणना भारतातील श्रीमंत अभिनेत्यांमध्ये होते. हा अभिनेता म्हणजे सुपरस्टार मामुटी. 


अभिनय क्षेत्रात येण्याचे स्वप्न, चुकून झाले वकील...


मामुटी यांचा जन्म केरळमधील कोट्ट्यम जिल्ह्यातील एका गावात झाला. मामुटी यांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन वर्ष वकिली देखील केली. लहानपणापासून अभिनेता होण्याचे स्वप्न पाहणारे मामुटी हे अपघातानेच वकिली क्षेत्रात आले. याबद्दल त्यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते. 


पहिल्या चित्रपटात मानधन नाही.... 


मामुटी यांनी एका मुलाखतीत म्हटले की, पहिला चित्रपट मिळवण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. के.एस. सेतुमाधवन की 'अनुभवंगल पालीचकल' (Anubhavangal Paalichakal) या चित्रपटात 20 व्या वर्षी एक्स्ट्रा कलाकार म्हणून काम केले. हाच पहिला चित्रपट होता. या चित्रपटासाठी फक्त प्रवास भाडे मिळत होते. त्याशिवाय इतर कोणतेही मानधन मिळाले नाही. 


अन् लीड रोल मिळाला... 


'मेला' हा त्यांचा पहिला मल्याळम चित्रपट होता, ज्यामध्ये त्यांना मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यानंतर  त्यांनी मागे वळून पाहिले नाही. या अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे.


100 कोटींच्या क्लबमध्ये एकही चित्रपट नाही...


मामूट्टी यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र आजपर्यंत त्यांच्या एकाही चित्रपटाचा 100 कोटींच्या क्लबमध्ये समावेश झालेला नाही. तरीही मामुटी यांना सुपरस्टार म्हणूनच ओळखले जाते. मल्यााळ सिनेसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. 


मामुटी यांची भूमिका असलेल्या 'भीष्म पर्वम' या चित्रपटाने जगभरात 87 कोटींची कमाई केली. त्याशिवाय, 'कन्नूर स्क्वाड' या चित्रपटाने 80.3 कोटींची कमाई केली. ब्रमायुगम या चित्रपटालाही लोकांची चांगली पसंती मिळाली. या चित्रपटाने 56.8 कोटींची कमाई केली. 






मामुटी यांची संपत्ती किती?


मामुटी हे भारतातील श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 340 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जाते. मामुटी राहत असलेल्या बंगल्याची किंमत ही 4 कोटींच्या घरात आहे. मामुटी यांचा मुलगा दुल्कर सलमान देखील मल्याळम सिनेमात सुपरस्टार आहे. या दोन्ही पिता-पुत्रांनी बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे.


साऊथ सिनेसृष्टीतील मेगास्टार मामूट्टी वयाच्या 72  व्या वर्षीही सिनेसृष्टीत कमालीचे चित्रपट करत आहेत. लवकरच ते 'टर्बो'चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन व्यशाक करत आहेत. विशू उत्सवाच्या दरम्यान या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली. हा एक ॲक्शन-कॉमेडी चित्रपट असून 13 जून 2024 रोजी रिलीज होणार आहे.