Samantha Prabhu : दक्षिण चित्रपटांची सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ओ अंटवा’ या गाण्यामुळे चर्चेत आहे. या गाण्यातील तिच्या डान्स मूव्हचे सर्वजण कौतुक करत आहेत. अभिनेत्रीची लोकप्रियता केवळ दक्षिणेतच नाही, तर बॉलिवूडमध्येही पाहायला मिळत आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हे नाव आणि ओळख मिळवण्यासाठी ही अभिनेत्री एक वेळ जेवून, दिवसरात्र मेहनत करत होती.


समंथा रुथने आयुष्याच्या या टप्प्यावर पोहोचण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली आहे आणि तिने खूप संघर्ष केला आहे. एक वेळ अशी होती की, त्यांच्याकडे एक वेळचे पुरेसे जेवण जेवायलाही पैसे नव्हते. हे आम्ही म्हणत नाही,  तर हे स्वतः समंथाने नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे. या मुलाखतीत तिने तिच्या संघर्षाबद्दल सांगितले आहे. समंथा म्हणाली की, ती सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप हुशार होती. समंथा तिच्या वर्गात इंटरमिजिएटपर्यंत नेहमी पहिल्या क्रमांकाने पास व्हायची. मात्र, पुढील शिक्षणासाठी तिच्या कुटुंबीयांकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने पैसे कमावण्यासाठी काम करायला सुरुवात केली.


बॉलिवूडमध्येही कमावले नाव


त्यापैकी एक नोकरी होती मॉडेलिंग. समंथाने सांगितले की, मॉडेलिंगच्या काळातच तिला 'ये माया चेसावे' चित्रपटाची ऑफर आली होती आणि त्यानंतर तिने आजपर्यंत मागे वळून पाहिले नाही. आजघडीला समंथाने तिच्या 11 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज तिची फॅन फॉलोइंग केवळ दक्षिणेतच नाही, तर संपूर्ण भारतात आहे. 'फॅमिली मॅन 2' या वेब सीरीजमुळे तिला ही ओळख मिळाली. या वेब सीरीजमध्ये समंथाने एलटीटीई कमांडोची भूमिका साकारली होती, ज्याचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते. अलीकडेच अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटातील आयटम साँगनंतर अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


एका गाण्यासाठी 5 कोटींची ऑफर


या चित्रपटातील केवळ 3 मिनिटांच्या आयटम साँगसाठी तिला 5 कोटींची ऑफर देण्यात आली होती. इतकेच नाही, तर नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अक्किनेनी कुटुंबाने समंथा रुथ प्रभूला जवळपास 200 कोटी रुपये पोटगी म्हणून देऊ केले होते. मात्र, अभिनेत्रीने ती एक स्वतंत्र महिला असून तिला पैशांची गरज नसल्याचे सांगत, कोणतेही पैसे घेण्यास नकार दिला.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha