Amol Kolhe :
राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी 'व्हाय आय किल्ड गांधी' या सिनेमात नथुराम गोडसेंची (Nathuram Godse) भूमिका साकारल्यानं  नवा वाद सुरू झाला. यावर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची प्रतिक्रियादेखील दिली होती. डॉ. अमोल कोल्हेंनी कलाकार म्हणून नथुराम गोडसेंची भूमिका साकारली असं त्यांनी म्हटलं होतं. डॉ. अमोल कोल्हेंनी आळंदीमध्ये महात्मा गांधींच्या रक्षा विसर्जन स्तंभाला अभिवादन करत आत्मक्लेश केला. विशेष म्हणजे नथुरामची भूमिका असलेला चित्रपट रविवारी प्रदर्शित होणार आहे. 


डॉ. अमोल कोल्हेंनी पुण्यातील आळंदीमध्ये महात्मा गांधींच्या रक्षा विसर्जन स्तंभाला अभिवादन केलं आणि त्याच स्तंभासमोर काळी काळ बसून आत्मक्लेशदेखील केला. तसेच नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्याने काहींच्या भावना दुखावल्या होत्या. त्याबद्दल त्यांनी दिलगिरीदेखील व्यक्त केली. दरम्यान अमोल कोल्हे म्हणाले,"महात्मा गांधींचे विचार हे शाश्वत आहेत. यावर माझा ठाम विश्वास आहे". 




आत्मक्लेश करताना अमोल कोल्हे म्हणाले
WHY I KILLED GANDHI या सिनेमात नथुरामची भूमिका केली. पण  ती विचारधारा स्वीकारली असा त्याचा अर्थ अजिबात नाही. एखादं नाटक, लेख किंवा एखाद्या चित्रपटामुळे महात्मा गांधी यांची विचारधारा पुसली जाणार नाही. मात्र या भूमिकेवर तरुणांमध्ये ज्या प्रकारे प्रतिक्रिया उमटली ती पाहाता यातून गांधींजींचे विचार आजही तरुणाईत तितकेच प्रभावीपणे रुजले असल्याचे दिसून आले ही महत्त्वाची बाब आहे. महात्मा गांधी यांच्या खुनाचे आपण कधीही समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही हे मी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र या भूमिकेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो.


वाद नेमका काय?
अमोल कोल्हे यांनी 2017 साली चित्रीकरण झालेल्या WHY I KILLED GANDHI या चित्रपटात नथुराम गोडसेंची भूमिका साकारली आहे.  हा चित्रपट आता लाईमलाईट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. आणि यातील महात्मा गांधींना मारणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका अमोल कोल्हे यांनी साकारल्याने अनेक चर्चांना उधान आले आहे.