नवी दिल्ली : दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांच्या ‘पुलिमुरुगन’ सिनेमातील गाण्यांना ऑस्करच्या यादीत चांगली पसंती मिळत आहे. ऑस्करने शॉर्टलिस्ट केलेल्या गीतांच्या ओरिजनल स्कोर (मूळ संगीत) आणि ओरिजन साँग (मूळ गीत) श्रेणीत ‘पुलिमुरुगन’ सिनेमाच्या गाण्यांनी पुढचा टप्पा गाठला आहे.


90 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘पुलिमुरुगन’ सिनेमातील सिनेमातील ‘कादनयूम कालचिलम्बे’ आणि ‘मानथे मारिकुरुम्बे’ या गाण्यांनी ‘ओरिजनल स्कोर’ श्रेणीत 141 तर ‘ओरिजनल साँग’ श्रेणीतून 70 वे स्थान पटकावले.

या सिनेमाची गाणी गोपी सुंदर यांनी संगीतबद्ध केली असून, आपल्या दोन्ही गाण्यांना ऑस्करच्या यादीत पसंती मिळत असल्याने, सोशल मीडियाद्वारे त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.

आपला आनंद व्यक्त करताना गोपी सुंदर यांनी म्हटलंय की, “ही सर्व परमेश्वराची कृपा आहे... मला हा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द सुचत नाही आहेत.”

‘पुलिमुरुगन’ सिनेमाचं दिग्दर्शन वैसाखने केलं असून, यंदा ऑस्करच्या शर्यतीतील हा एकमेव भारतीय सिनेमा ठरला आहे. सिनेमात दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल मुख्य भूमिका साकारत आहेत. त्यांच्याशिवाय कामलिनी मुखर्जी आणि जगपती बाबू हे देखील या सिनेमात प्रमुख भूमिका साकारत आहेत.

हा सिनेमा ऑक्टोबर 2016 मध्ये रिलीज झाला होता.

दरम्यान, ओरिजनल स्कोर श्रेणीत शॉर्टलिस्ट झालेल्या सिनेमांमध्ये वंडर वीमेन, वॉर फॉर द प्लॅनेट ऑफ द अॅप्स, लोगान, किंग्समॅन : द गोल्डन सार्किल, जस्टिस लीग, कोको, इट, फर्डिनँड आदी सिनेमांचा समावेश करण्यात आला आहे.

सिनेमाचा ट्रेलर पाहा