Sonu Sood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) केवळ पडद्यावरचा नाही तर खऱ्या आयुष्यातील हिरो देखील मानले जात नाही. कोरोनाच्या काळात सोनू सूद लाखो लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आला होता. सोनू सूदने हाती घेतलेला हा वसा आजही अविरत सुरु ठेवला आहे. केवळ कोरोनाच्या काळातच नाही, तर आजही तो लाखो गरीबांना मदत करतो. आजही त्याच्या घराबाहेर मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लोकांना रांग लागलेली असते. केवळ गरजू लोकच नाही तर, अभिनेत्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देखील मदत करण्याचा वसा हाती घेतला आहे. आता सोनू सूद ‘आयएएस’ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणार आहे.
अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आयएएस परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सुरू करणार आहे. अभिनेत्याने त्याच्या ट्विटर हँडलवर या संदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने याबाबतची माहिती दिली आहे. सोनू सूदने लिहिले की, ‘चला मिळून नवा भारत घडवूया. ही 2022-23ची अशी नवी सुरुवात. IAS परीक्षेसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग.’ त्याने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘आयएएसची तयारी करायचीय, आम्ही घेऊ तुमची जबाबदारी.’
पाहा पोस्ट :
कसा कराल अर्ज?
मोफत कोचिंगसाठी विद्यार्थी सोनू सूद फाउंडेशन ग्रुपच्या दिलेल्या लिंकवर जाऊन नोंदणी करू शकतात. याशिवाय नोंदणीसाठी फाउंडेशनने ठरवून दिलेली फी भरावी लागेल. या कोचिंगद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील सर्वोच्च नागरी सेवा संस्थांमध्ये मोफत ऑनलाईन आयएएस कोचिंग दिले जाईल. याशिवाय फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे.
सोनू सूदच्या (Sonu Sood) या उपक्रमाचे खूप कौतुक होत आहे. सोशल मीडियावर त्याचा हा उपक्रम चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. नुकतेच सोनूच्या एका चाहत्याने त्याला रक्ताने बनवलेले पेंटिंग भेट म्हणून दिले होते. सोनूने चाहत्याला सल्ला देताना म्हटले होते की, ‘रक्तदान करून एखाद्याची मदत करा. माझे असे पेंटिंग बनवून ते वाया घालवू नका!’.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मदत करण्याचा प्रयत्न तो करतो. अनेक गरजू लोक सोशल मीडियाद्वारे अभिनेता सोनू सूदला टॅग करून मदतीचे आवाहन करताना दिसतात.
संबंधित बातम्या