TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


'आपडी-थापडी'चा टीजर लाँच


अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची जोडी दसऱ्याला एक नवीन चित्रपट घेऊन येत आहे. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या 'आपडी थापडी' या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर लाँच झाला आहे.


महेश मांजरेकरांनी केली 'निरवधी' सिनेमाची घोषणा


गेल्या काही दिवसांपासून अनेक दर्जेदार मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. कोरोनामुळे प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मला प्राधान्य दिलं होतं. पण कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. 'झिम्मा', 'पावनखिंड', धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमांनी सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता 'निरवधी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


बिंदास काव्याचे एका दिवसांत वाढले तब्बल 70 हजार सबस्क्राईबर


औरंगाबादची प्रसिद्ध युट्युबर बिंदास काव्या  शुक्रवारी दुपारी अचानक बेपत्ता झाली. काव्याच्या मिसिंगबाबत तिच्या आई-वडिलांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून याची माहिती दिली आणि एकच खळबळ उडाली. पण या सर्व घडामोडीनंतर पोलिसांनी अखेर तिला शोधून काढले. पण या काळात काव्याची एवढी चर्चा झाली की, एका दिवसांत बिंदास काव्याचे युट्युबवर तब्बल 70 हजार  सबस्क्राईबर वाढले. 


सलमान खानच्या अडचणीत वाढ


बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या चर्चेत आहे. आता भाईजानच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकीचं पत्र मिळाल्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. अशातच आता सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या एका शूटरने खुलासा केला आहे की, सलमान खान गॅंगस्टर्सच्या निशाण्यावर आहे.


अभिनेते कृष्णम राजू यांचे निधन


दाक्षिणात्य अभिनेते कृष्णम राजू यांचे निधन झाले आहे. कृष्णम राजू यांनी वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. टॉलिवूडचे 'रिबेल स्टार' अशी कृष्णम राजू यांची ओळख होती. त्यांनी 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.  राधे श्याम हा त्यांचा शेवटचा चित्रपट. कृष्णम राजू यांनी सामाजिक, कौटुंबिक, रोमँटिक, थ्रिलर कथानकावर आधारित असणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केले. 


कार्तिक आर्यन-सारा अली खान पुन्हा एकत्र?


कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरत होती. परंतु त्यांच्या ब्रेकअपने त्यांचे चाहते नाराज झाले होते. या दोघांनी कधीही आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली नव्हती. मात्र ब्रेकअपनंतर या दोघांची काही वक्तव्ये चर्चेत आली होती.त्यानंतर ते दोघे कधीच एकत्र दिसून आले नव्हते. मात्र अलीकडे त्यांच्यातील वाद मिटलेला दिसून येत आहे. नुकतंच सारा आणि कार्तिक एकत्र दिसून आले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


बिग बॉस मराठी कधीपासून सुरु होणार?


छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2 ऑक्टोबरला बिग बॉसमराठीचा ग्रॅंड प्रीमिअर होणार आहे. 


'ब्रह्मास्त्र'ने जगभरात केली 160 कोटींची कमाई


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'ओपनिंग डे'ला या सिनेमाने जगभरात 75 कोटींची कमाई केली होती. तर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या सिनेमाने जगभरात 85 कोटींची कमाई करत 100 कोटींचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत या सिनेमाने जगभरात 160 कोंटीचा गल्ला जमवला आहे. 


भाईजानचा बिग बॉस होणार सुरू, प्रोमो आऊट


बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 1 ऑक्टोबरला बिग बॉसच्या 16 व्या पर्वाचा ग्रॅंड प्रीमिअर होणार असं म्हटलं जात आहे. बिग बॉसचा नवा प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. प्रोमो आऊट झाल्याने चाहत्यांना आता बिग बॉस 16 ची प्रतीक्षा आहे. 


'मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' वाचकांच्या भेटीला


'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या सिनेमात डॉक्टरांच्या आयुष्यातील काळी बाजूच जास्त प्रमाणात दाखवण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला खरे डॉक्टर कळावेत या पोटतिडकीतून या नाटकाचा आणि पुस्तकाचा जन्म झाला आहे. ही गोष्ट रमेश भिडे यांना बोचत होती. त्यामुळेच त्यांनी 'मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' हे पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला. या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ. काशिनाथ घाणेकर खऱ्या अर्थाने तरुणांपर्यंत पोहोचतील.