Sonu Nigam Asha Bhosle :   जगद्विख्यात पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले (Asha Bhosle) यांच्यावरील या 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचे आणि  दुर्मिळ छायाचित्रांचे 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी गायक सोनू निगम याने भरमंचावर स्वरसम्राज्ञी असलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे पाय गुलाब पाण्याने धुत पाद्य पूजन केले. 


आशा भोसले यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. नरेंद्र हेटे आणि अमेय हेटे यांनी उषा मंगेशकरांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात बोलताना सोनू निगम याने म्हटले की, आज सोशल मीडियावर अनेक गोष्टी गायनाबाबत शिकण्यासाठी आहेत. मात्र, त्यावेळी लताजी आणि आशाजी या होत्या. आशाताई आम्ही तुमच्याकडून जे काही शिकलो, त्यासाठी आभार व्यक्त करतो. आम्ही अजूनही तुमच्याकडून शिकतोय. आपल्या हिंदू धर्मात, सनातन धर्मात गुरूंना देवाचे स्थान दिले जाते. आमच्यासाठी तुम्ही देवी आहेत. मी सनातन धर्माच्यावतीने तुमचा सन्मान करू इच्छितो असे सांगत सोनू निगमने भरमंचावर आशाताईंचे पाय धुत पाद्य पूजन केले.  यावेळी मंचावर मंत्रोच्चार सुरू होता. 


दरम्यान, या कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर,  ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आदी उपस्थित होते.