मुंबई : बॉलिवूडमध्ये कोणीच कोणाचा कायमस्वरुपी मित्र नसतो, तसा कोणीच कोणाचा शत्रूही नसतो. नात्यांचं हे बदलतं समीकरण अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाच्या निमित्ताने पुन्हा सिद्ध झालं आहे. सोनमने दहा वर्षांपासूनचा अबोला संपवत अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत सूत जुळवलं.
सोनमने फोन करुन ऐश्वर्याला आपल्या लग्नाचं आमंत्रण दिल्याची माहिती आहे. सोनम उद्या (मंगळवारी) बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत लगीनगाठ बांधणार आहे. संगीत, मेहंदी यासारख्या समारंभांना थाटात सुरुवात झाली आहे. उद्याच लग्नाचं रिसेप्शन होणार असून लग्नाला कोणकोण पाहुणे हजेरी लावणार याची उत्सुकता आहे.
दहा वर्षांपूर्वी सोनमने ऐश्वर्याला आधीच्या पिढीतील 'आंटी' म्हटलं होतं. 'कान्स' चित्रपट महोत्सवाशी निगडीत एका कॉस्मेटिक ब्रँडची अॅम्बेसेडर म्हणून सोनमने ऐश्वर्याची जागा घेतली होती. सोनमला रेड कार्पेटवर चालण्याची संधी मिळू नये, यासाठी ऐश्वर्याने फिल्डिंग लावल्याचंही म्हटलं जातं. मात्र गेल्या काही वर्षांत सोनमने 'कान्स'मध्ये फॅशन फिएस्ता म्हणून नाव कमावलं आहे.
तेव्हापासून सोनम आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरु आहे. मात्र लग्नाच्या निमित्ताने हा दुरावा मिटवण्यासाठी सोनमने पुढाकार घेतला. सोनमच्या आईने ऐश्वर्याला निमंत्रण दिलं. त्यानंतर सोनमने स्वतः फोन करुन ऐश्वर्याला अगत्याने येण्यास सांगितलं.
ऐश्वर्या लग्नाला उपस्थिती लावणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सोनमच्या निमंत्रणाला मान ठेवून ऐश्वर्याने वादावर पडदा टाकला, तर चाहत्यांनाही आनंद होईल, हे निश्चित.