“अनेक प्रेक्षकांना ‘102 नॉट आऊट’ सिनेमाच्या शेवटी असलेलं गाणं ऐकता, पाहता येत नाही. त्यामुळे थिएटर मालकांनो, कृपया ते गाणं न कापता पूर्ण सिनेमा दाखवा.”, असे ट्वीट करुन अमिताभ बच्चन यांनी गाण्याची लिंकसुद्धा शेअर केली आहे.
विशेष म्हणजे, या ट्वीटसोबत अमिताभ बच्चन यांनी हात जोडलेला फोटो अपलोड केला आहे.
सिनेमाचा शो लवकर संपवण्यासाठी अनेक ठिकाणी थिएटर मालक ‘102 नॉट आऊट’ सिनेमाच्या शेवटी असलेलं गाणं कट करतात. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर यासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. त्यांची दखल घेत, अमिताभ बच्चन यांनी थिएटर मालकांना विनंती केली आहे.
4 मे रोजी रिलीज झालेल्या ‘102 नॉट आऊट’ सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवरील गल्ल्याचा विचार करता, या सिनेमाची सुरुवात तशी फार काही चांगली झाली नाही. तरण आदर्श यांच्या माहितीनुसार, ‘102 नॉट आऊट’ सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ 3.52 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 5.53 कोटी रुपये कमावले. दोन दिवसात 9.05 कोटी रुपयांचा गल्ला ‘102 नॉट आऊट’चा जमला आहे.
राजकुमार रावचा ‘ओमर्ता’ हा सिनेमाही 4 मे रोजी रिलीज झाला. मात्र ‘ओमर्ता’ सिनेमाची कमाई खूप कमी आहे. त्यामुळे त्या तुलनेत ‘102 नॉट आऊट’ने चांगली कमाई केली असली, तर या सिनेमातील स्टारकास्ट पाहता, आणखी अपेक्षा होती.
बिग बी अमिताभ बच्चन, ऋषी कपूर यांच्यासारखे दिग्गज या सिनेमात असून, उमेश शुक्ला यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे.