Sonali Phogat Case : टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat) हत्या प्रकरण आता सीबीआयकडे सोपवण्याची तयारी सुरु झाली आहे. सोनाली फोगाट यांच्या मुलीने आणि त्यांच्या नातेवाईकांनीही सदर प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. अखेर आता हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावं यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. यात ते सदर प्रकरण गोवा पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी करणार आहेत.


या संदर्भात बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, ‘सोनाली फोगाट प्रकरण गोवा सरकार सीबीआयकडे सोपवण्याची तयारी करत आहे. सोनाली यांच्या मुलीने आणि त्यांच्या नातेवाईकांनी देखील अशीच मागणी केली होती. त्यांची मागणी विचारत घेऊन मी आज गृहमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहिणार आहे. सोनाली फोगाट प्रकरण आता सीबीआयकडे सोपवण्यात यावं, अशी मागणी या पत्राद्वारे करणार आहे.’


कुटुंबीयांकडून सातत्याने सीबीआय चौकशीची मागणी!


सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी केलेल्या तपासावर असमाधान व्यक्त करत त्यांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआय मार्फत या प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यासाठी गोवा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात माहिती देताना त्यांचे नातेवाईक विकास सिंघमार यांनी आपण सीबीआय चौकशीसाठी भारताचे मुख्य न्यायाधीश यूयू ललित यांना पत्र लिहिल्याचे म्हटले होते. गोवा पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु नाहीये. त्यामागे राजकीय दबाव हे कारण असू शकतो. त्यामुळे आता आम्ही गोवा उच्च न्यायालयात जाणार आहोत आणि या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार आहोत, असे त्यांनी म्हटले होते.


सुधीर सांगवानने दिली गुन्ह्याची कबुली


सोनाली फोगाट हत्या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. यात त्यांचा पीए सुधीर सांगवानहा देखील सामील असून, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुधीरने पोलिसांना कबुली जबाब दिला आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, तो सोनाली यांना पार्टीच्या बहाण्याने कर्लीज हॉटेलमध्ये घेऊन गेला, जिथे त्याने सोनाली यांना जबरदस्तीने पाण्यात अंमली पदार्थ मिसळून प्यायला लावले. सुखविंदरने त्याला ड्रग्ज घेण्यात मदत केल्याचेही सुधीरने आपल्या कबुलीजबाबात सांगितले. त्यानंतर सुखविंदरनेही ही गोष्ट कबुल केली. गोव्यात शूटिंगचा कोणताही प्लॅन नव्हता, त्यांना गोव्यात आणण्याचा हा कट होता, असे त्याने पोलिसांनी सांगितले आहे. तसेच, सोनालीच्या हत्येचा कट फार पूर्वीपासून रचला गेला होता, याची कबुली देखील त्याने दिली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: