Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आणि कुणाल बेनोडेकर यांच्या लग्नाची चर्चा सोशल मिडीयापासून तिच्या चाहत्यांपर्यंत चांगलीच रंगली आहे. सोनाली आणि कुणाल यांच्या लग्नातील काही खास क्षणांवर असलेले ‘तुला मी मला तू…’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
‘तुला मी मला तू…’ हे गाणं अमेय जोग आणि प्रियांका बर्वे यांच्या सुमधुर आवाजात गायले आहे. तर या गाण्याचे संगीतकार अमेय आणि दर्शना असून गीतकार प्रशांत मडपुवार आहेत. गाण्यामध्ये दोघांनीही एकमेकांना दिलेले सात जन्माचे वचन, प्री-वेडिंगचा अप्रतिम डान्स, पाहुण्यांची रेलचेल, दागिन्यांमध्ये सजलेले वर- वधू आणि वेगवेगळ्या फुलांच्या माळांनी सजवलेले मंडप असे अनेक क्षणचित्रे यात टिपले आहेत.
गाण्याबद्दल संगीतकार अमेय व दर्शना म्हणतात, “सातासमुद्रापलीकडे पार पडलेले सोनाली आणि कुणाल यांच्या लग्नावर गाणे करायचे जेव्हा आम्ही ठरवले, तेव्हा कोणताही वेळ न दवडता आम्ही होकार दिला. हे प्रेमगीत प्रत्येकाच्या ओठांवर रूळणारं आहे. लग्नातील क्षणचित्रे गाण्यांमध्ये दाखवणे आमच्यासाठी आव्हनात्मक होते. सोनालीचं हे गाणं तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.”
गाण्याबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, “ लग्न म्हटलं तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खास क्षण असतो. माझ्या लग्नातील खास क्षण मी गाण्याच्या स्वरूपात टिपून ठेवला आहे आणि तेच खास क्षण मी माझ्या चाहत्यांसोबत शेअर करतेय .”
अगदी मोजक्याच नातेवाईक, मित्रपरिवारासोबत सोनाली -कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. मात्र त्याचे फोटो, व्हिडीओ कुठेच झळकले नव्हते. त्यामुळे सोनालीचे लग्न कसे झाले, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती आणि म्हणूनच चाहत्यांची ही इच्छा 'प्लॅनेट मराठी' ओटीटी पूर्ण करत आहे. त्यामुळे आता चाहत्यांना सोनाली आणि कुणालच्या आयुष्यातील या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे. एखाद्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 11 ऑगस्ट रोजी झळकणारा हा लग्नसोहळा काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
सोनाली कुलकर्णी म्हणते, “आपले लग्न धुमधडाक्यात व्हावे, हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. माझेही होते. परंतु जागतिक महामारीमुळे आम्ही रजिस्टर लग्न केले. त्यामुळे आमच्या लग्नात माझ्या माहेरच्या- सासरच्या कोणालाच सहभागी होता आले नाही. त्यामुळेच सर्व काही आलबेल झाल्यानंतर आम्ही आमच्या जवळच्या लोकांसोबत अगदी पारंपरिक पद्धतीने लग्न केले. त्यानंतर आधुनिक पद्धतीने रिसेप्शनही केले. खरंतर कलाकार हे नेहमीच आपल्या अनेक वैयक्तिक गोष्टी या खासगी ठेवतात, मात्र मला माझा आयुष्यतील आनंदाचा क्षण माझ्या चाहत्यांसोबत शेअर करायचा आहे, म्हणूनच मी या सोहळ्याचे प्रसारण करण्याचे ठरवले आणि यासाठी प्लॅनेट मराठीसारखे उत्तम ओटीटी मला मिळाले, ज्यामुळे माझा लग्नसोहळा जगभरातील मराठी प्रेक्षक पाहू शकतील.''
संबंधित बातम्या