मुंबई : 'कौन बनेग करोडपती 11' कार्यक्रमात एका सोप्या प्रश्नासाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला लाईफलाईन घ्यावी लागल्याने ती ट्रोल होत आहे. सोनाक्षी एका स्पेशल एपिसोडमध्ये रुमा देवी यांना सोबत देण्यासाठी आली होती. मात्र सोनाक्षीला या कार्यक्रमात सहभागी होणं चांगलच महागात पडलं आहे.


अमिताभ बच्चन यांनी सोनाक्षीला रामायणासंबंधी अत्यंत सोपा प्रश्न विचारला होता. मात्र त्या प्रश्नाचं उत्तरही सोनाक्षीला देता न आल्याने नेटिझन्सने तिला ट्रोल केलं. रामायणात हनुमानाने संजीवनी बुटी कुणासाठी आणली होती? असा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी सोनाक्षीला विचारला. त्यासाठी A. सुग्रीव B. लक्ष्मण C. सीता D. राम असे चार पर्याय देण्यात आले होते.


मात्र पर्याय पाहूनही सोनाक्षी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नाही. त्यावेळी तिने खेळाच्या नियमानुसार लाईफलाईन वापरण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षीने तज्ज्ञांचा सल्ला घेत योग्य उत्तर दिलं. त्यावेळी अमिताभ बच्चनही थोडे आश्चर्यचकित झाले होते.


सोनाक्षीच्या वडिलांचं नाव शत्रुघ्न सिन्हा आहे. काकांची नावं लक्ष्मण, भरत आणि भावांची नावं लव, कुश आहेत. सर्वांची नावं रामायणाशी निगडीत आहेत. याशिवाय सोनाक्षी कुटुंबियांसोबत ज्या घरात राहते, त्याचं नावही 'रामायण' आहे. अशावेळी रामायणाशी संबंधित अगदी सोप्या प्रश्नाचं उत्तर सोनाक्षीला आलं नाही, याचं सर्वांना आश्चर्य वाटत आहे.