Singer KK Death : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदय विकाराचा झटका आल्यानं त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. केके यांनी घेतलेल्या अचानक एक्झिटमुळं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील एक सुरेल तारा हरपल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. केके (Krishnakumar Kunnath) यांच्या मृत्यूपूर्वी एक अशीच काहीशी घटना समोर आली होती. ज्यामध्ये एका मल्याळम गायकाचा मृत्यू झाला होता. मल्याळम गायक एडवा बशीर (Edava Basheer) यांना एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असताना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी जगाचा निरोप घेतला होता.  
 
केरळमध्ये झाला गायकाचा मृत्यू 


कृष्ण कुमार कुन्नथ उर्फ केके यांच्यासाठी कोलकाता येथे झालेली लाईव्ह कॉन्सर्ट अखेरची ठरली. त्यांनी जगाचा निरोप घेतला. यापूर्वी एका दिवसाआधीच केरळच्या आलप्पुझामध्ये मल्याळम गायक एडवा बशीर यांचा लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असताना मृत्यू झाला. त्यादरम्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. त्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, गायक एडवा बशीर स्टेजवर परफॉर्म करत असतानाच अचानक स्टेजवर कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 


अशीच एक घटना अनेक वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये घडली होती. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक मुकेश कुमार यांचाही मृत्यू एका स्टेज शो दरम्यान झाला होता. 27 ऑगस्ट 1976 रोजी मुकेश अमेरिकेत स्टेज शो करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं.


लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं निधनंही असंच काहीसं झालं होतं. नागपुरात दीक्षाभूमीजवळ एका दूरचित्रवाहिनीचं लाँचिंग विठ्ठल उमप यांच्या प्रमुख उपस्थितीत होत होतं. त्यावेळी गौतम बुद्धांच्या मूर्तीला शाहिरांनी वाकून नमस्कार केला आणि उपस्थितांसमोर मोठ्यानं 'जय भीम'चा जोरदार नारा दिला. तेव्हाच चक्कर येऊन ते व्यासपीठावर कोसळले. त्यांना तातडीनं उपचारासाठी नेण्यात आलं, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. त्यांची प्राणज्योत मालवली होती. 


शेवटच्या क्षणी अस्वस्थ दिसले KK 


कोलकात्यात गायक केके यांची कॉन्सर्ट ऐकण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. केके यांच्या आवाजात एवढी ताकद होती की, गाणं कानावर पडताच चाहते मंत्रमुग्ध व्हायचे. कालच्या कॉन्सर्टमध्येही तेच झालं. केके स्टेजवर परफॉर्म करत होते आणि चाहते मंत्रमुग्ध झाले होते. पण अचानक केके यांना अस्वस्थ वाटू लागलं. ते घामानं ओलेचिंब झाले. परफॉर्म करता-करता त्यांनी एक टॉवेल घेतला आणि आपला घाम पुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती खालावली. भर कॉन्सर्टमधून त्यांना हॉटेलमध्ये आणण्यात आलं. पण त्यांची तब्येत आणखी खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आलं. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. केके यांनी जगाचा निरोप घेतला होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :