मुंबई : युवा संगीतकार आणि प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल यांचं निधन झालं. ते अवघ्या 35 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर घरीच उपचार चालू होते. त्यातूनही आदित्य आपलं संगीताचं काम करत होतेच. अगदी दोन दिवसांपूर्वीपर्यंत कार्यरत असणाऱ्या आदित्य यांच्या निधनाच्या वृत्ताने संगीतक्षेत्राला धक्का बसला आहे.
सुप्रसिद्ध संगीतकार अरुण पौडवाल आणि गायिका अनुराधा पौडवाल यांना आदित्य आणि कविता ही दोन मुलं. कविता गायनात प्रवीण आहे. तर आदित्यने मात्र आपल्या वडिलांचा वसा पुढे नेला. आदित्य कधीच चर्चेत नसायचा पण त्याचं काम मात्र चालू होतं. अनुराधा यांच्या अनेक अध्यात्मिक गाण्यांना आदित्यने स्वरसाज चढवला आहे. या गणपतीमध्ये त्याने अनुराधा पौडवाल यांच्यासोबत उमागणपती नावाचं सिंगल आणलं होतं. त्यातल्या त्याच्या वाद्यसंरचनेचं खूप कौतुकही झालं. काळापुढचा विचार त्यांच्या संगीतात होता.
आदित्य यांना मूत्रपिंडाचा विकार होता. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्रातल्या मान्यवरांनीही हळहळ व्यक्त केली आहे. गायक शंकर महादेवन यांनाही या बातमीने धक्क बसला असून, केवळ दोन दिवसांपूर्वीच आपण त्याच्यासोबत गाणं रेकॉर्ड केल्याचं ते सांगतात. या बातमीने आपल्याला जबर धक्का बसल्याचंही त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
आदित्य आणि कविता ही दोन्ही नावं मराठी संगीतक्षेत्राला अपरिचित नाहीत. आदित्य सातत्याने छोटी छोटी गाणी करुन सोशल मीडियावर शेअर करत होते. त्याच्या फेसबुकवरच्या वॉलवर नजर टाकली तर अतिशय हळूवार, तरल मनाचे आदित्य होते. अरुण पौ़डवाल आणि अनुराधा यांनी मराठी संगीतविश्वाला दिलेल्या गाण्यांचे संदर्भ सातत्याने त्यांच्या वॉलवर दिसतात. आई-वडिलांचे जुने फोटो.. त्यावरच्या कॅप्शन्स लक्ष वेधून घेतात. त्यांच्या अचानक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.