मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री आलिया भट या कोणे एके काळच्या लव्हबर्ड्सच्या ब्रेकअपनंतर चाहते नाराज झाले होते. दोघांनी आपल्या नात्याविषयी कधीच जाहीर वाच्यता केली नव्हती. मात्र 'कॉफी विथ करण 6'च्या एपिसोडमध्ये सिद्धार्थने आपलं मन मोकळं केलं आहे. इतकंच नाही, तर जॅकलीन फर्नांडिस आणि कियारा अडवाणी यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवरही उत्तर दिलं आहे.


'कॉफी विथ करण 6'च्या एपिसोडमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत आशिकी फेम अभिनेता आदित्य रॉय कपूरला निमंत्रित करण्यात आलं आहे. यावेळी, ब्रेकअपनंतर आलियासोबतच्या नात्याविषयी करणने सिद्धार्थला छेडलं. याला उत्तर देताना दोघांच्या नात्यात कडवटपणा नसल्याचं स्पष्टीकरण सिद्धार्थने दिलं.

'काही कारणांमुळे आम्हाला एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घ्यावा लागला. आमच्या नात्यात चढउतार आले, त्यामुळे रिलेशनशीपवर परिणाम झाला.' असं सिद्धार्थ म्हणाला.

'डेटिंग सुरु करण्यापूर्वी मी आलियाला ओळखत होतो. स्टुडंट ऑफ दि इयरचा पहिला सीन मी आलियासोबत शूट केला होता. त्यामुळे हे नातं फक्त 'एक्स' म्हणण्यापुरतं नाही. जेव्हा एखादं नातं तुटतं, तेव्हा चांगल्या आणि सुंदर आठवणी लक्षात ठेवायला हव्यात' असंही सिद्धार्थ म्हणाला.

जॅकलीन फर्नांडिस आणि कियारा अडवाणी यांच्याशी नाव जोडलं जाण्याबाबतही सिद्धार्थने उत्तर दिलं. जॅकलीनसोबत खास नातं असलं, तरी डेटिंगच्या चर्चांमध्ये काहीच अर्थ नाही, असंही तो म्हणाला. कियारासोबत डेटिंगच्या चर्चा एखाद दिवस खऱ्या ठराव्यात अशी अपेक्षा आहे, असे संकेतही सिद्धार्थने दिले.

आलिया आणि अभिनेता रणबीर कपूर सध्या डेट करत आहेत. कपूर कुटुंबाला आलिया सून म्हणून पसंत असल्याचंही म्हटलं जातं.