Tamil Actor Siddharth Press Conference : तामिळ अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) सध्या त्याच्या आगामी 'चिक्कू' (Chikku) या सिनेमाचं प्रमोशन करत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो बंगळुरूला गेला होता. तिथे त्याने एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. पण या पत्रकार परिषदेदरम्यान काही आंदोलकांनी मात्र गोंधळ घातला. 


कन्नड समर्थक आंदोलकांचा गोंधळ


बंगळुरू येथील पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एएनआयनेदेखील या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ मंचावर पत्रकार परिषद घेताना दिसत आहे. या परिषदेदरम्यान कन्नड समर्थक आंदोलक येतात आणि घोषणाबाजी करू लागतात. तसेच हे आंदोलक अभिनेत्याला पत्रकार परिषद थांबवण्यास सांगत आहेत. त्यानंतर अभिनेता पत्रकार परिषदेतून बाहेर पडताना दिसत आहे.






पत्रकार परिषदेत अभिनेत्याकडे लोकांनी केली 'ही' मागणी


कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या विरोधात गुरुवारी मांड्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. गेल्या 15 दिवसांपासून ते आंदोलन करत आहेत. कावेरी नदीबाबत सुरू असलेला हा वाद खूप जुना आहे.  
या वादावर अलीकडेच बंगळुरूमध्ये कलम 144 लागू करण्यात आले होते. याशिवाय सर्व शाळा-महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती.याशिवाय 29 सप्टेंबर रोजी कर्नाटक बंदचीही घोषणा करण्यात आली आहे.


तामिळ अभिनेता सिद्धार्थचा 'चिक्कू' हा कन्नड सिनेमा आहे. एस यू अरुण कुमार यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सिद्धार्थसह या सिनेमात निमिषा सजयन, अंजली नायर आणि सहस्त्र श्री या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते. 28 सप्टेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रकाश राज यांनी सिद्धार्थचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"सामान्य माणसांना आणि कलाकारांना त्रास देणाऱ्या या लोकांचा निषेध..सॉरी सिद्धार्थ". 






संबंधित बातम्या


कावेरी पाणी प्रश्न पेटला; पाणी तमिळनाडूला दिल्याच्या निषेधार्थ कर्नाटक बंद, कन्नड समर्थक आणि शेतकरी संघटनांचा पाठिंबा