मुंबई : आयकॉनिक 'शोले' चित्रपटात 'सांबा'ची भूमिका साकारणारे अभिनेते मॅक मोहन चांगलेच गाजले होते. त्यांच्या कन्या मंजरी आणि विनती आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. 'डेझर्ट डॉल्फिन' या स्केटबोर्डिंगवर आधारित चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारी दोघी घेत आहेत.

महिला सक्षमीकरणाचा नारा देणाऱ्या 'डेझर्ट डॉल्फिन' या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शनाची धुरा मंजरीच्या हाती आहे, तर सहलेखन-निर्मितीचं धनुष्य विनती पेलणार आहे. राजस्थानातील एका दुर्गम गावात या सिनेमाचं कथानक घडतं. 16 वर्षांची प्रेरणा आणि लॉस एंजलसहून आलेली 34 वर्षीय ग्राफिक आर्टिस्ट जेसिका यांच्यावर या चित्रपटाच्या कथा बेतलेली आहे. स्केटबोर्डिंगवर आधारित हा देशातील पहिलाच चित्रपट आहे. उदयपूरजवळ या सिनेमासाठी स्केटग्राऊण्डची निर्मिती करण्यात आली.

मंजरीने जवळपास बारा वर्ष सिनेसृष्टीत काम केलं आहे. ख्रिस्तफर नोलान, विशाल भारद्वाज यासारख्या दिग्दर्शकांसोबत तिने काम केलं आहे. डंकर्क, द वंडर वुमन, मिशन इम्पॉसिबल 4 यासारख्या हॉलिवूडपटांसोबत सात खून माफ, वेक अप सिद सारख्या चित्रपटांसाठी तिने सहाय्यक दिग्दर्शन केलं आहे.

'सांबा' मॅक मोहन

1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले' चित्रपटात गब्बर सिंहच्या टोळीतील 'सांबा'च्या व्यक्तिरेखेत मॅक मोहन दिसले होते. मोहन माखिजानी हे त्यांचं मूळ नाव. त्यांनी केलेल्या असंख्य भूमिकांपैकी 'सांबा'ची भूमिका प्रेक्षकांना विशेष लक्षात राहिली. त्यातही 'अरे ओ सांबा' ही गब्बरची आरोळीच संस्मरणीय होती. 2009 मध्ये 'लक बाय चान्स' चित्रपटात ते अखेरचे दिसले. 2010 साली वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.