मुंबई : 'दंगल' आणि 'सिक्रेट सुपरस्टार' चित्रपटातील अभिनेत्री झायरा वसीमने अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. धर्माच्या नावावर अभिनय सोडण्याचा निर्णय दबावात घेतल्याचा आरोप शिवसेना आणि भाजपने केला आहे.

झायराने रविवारी (30 जून) इन्स्टाग्रामवर सहा पानांच्या मोठ्या पत्रात सिनेसृष्टी सोडण्याच्या निर्णयाची माहिती दिली. झायराने म्हटलं आहे की, या क्षेत्रातील झगमगाट आणि यश मला ईश्वर आणि इमानापासून सातत्याने दूर नेत आहे.

शिवसेनेची टीका
धर्माच्या नावावर सिनेसृष्टी सोडण्याच्या निर्णयावर शिवसेनेने टीका केली आहे. शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी झायराच्या या निर्णयावर भलीमोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे की, "जर तुला ते आकर्षित करत असेल तर तू तुझ्या आस्थेचं पालन करु शकते. पण तुझ्या करिअरचा निर्णय धर्माशी जोडू नको. तुझं हे पाऊल तुझ्या धर्माला असहिष्णु ठरवतं, पण प्रत्यक्षात असं नाही. हा निर्णय तिच्या (झायरा वसिम) धर्मासाठी एक प्रतिगामी पाऊल आहे आणि इस्लाममध्ये सहिष्णुतेला जागा नाही, या चुकीच्या धारणेला आणखी हा निर्णय दुजोरा देतो.




भाजपचा सवाल, उमर अब्दुल्लांचा पाठिंबा
भाजपनेही झायरा वसीमच्या निर्णयावर टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन म्हणाले की, "धर्माच्या आधारावर अभिनय सोडण्याचा निर्णय दबावात घेतल्याचं दिसत आहे. ती सातत्याने कट्टरवादी संघटनांच्या निशाण्यावरही होती.


दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी झायराच्या निर्णयाचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे. चित्रपटात काम करत असल्याने मूळची काश्मीरची असलेली झायरा सातत्याने कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर होती.

अबू आझमी यांचंही समर्थन
अभिनेत्री झायरा वसीमचा हा निर्णय इस्लाम धर्माचं पालन करणाऱ्यांसाठी योग्य आहे, असं म्हणत अबू आझमी यांनी तिच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. इस्लाम धर्मात नाच-गाणं चालत नाही, असंही ते म्हणाले.