मुंबई : आमिर खानच्या 'दंगल' सिनेमानातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या झायरा वसीम हिने सिनेसृष्टीतून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या 18 व्या वर्षी आणि 5 वर्षाच्या बॉलिवूड करिअरनंतर तिने बॉलिवूडला अलविदा केला आहे. झायराच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.


झायराने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपला निर्णय चाहत्यांपर्यंत पोहोचवला आहे. अल्लाहने दाखवलेल्या रस्त्यापासून भटकले होते, असा उल्लेख जायराने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.



पाच वर्षांपूर्वी मी जो निर्णय घेतला होता, त्याने माझं आयुष्य बदलून गेलं. माझा हा प्रवास स्वत:ला थकवणारा होता. या पाच वर्षात मी स्वत:शी संघर्ष केला. लहान आयुष्यात एवढा संघर्ष मी करु शकत नाही. त्यामुळे मी बॉलिवूडशी आपलं नातं तोडत आहे, असं झायराने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.


झायराने या पोस्टमध्ये कुराणचा उल्लेखही केला आहे. तिने ही पोस्ट कुणाच्या दबावाखाली तर लिहिली नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.





दंगल सिनेमासाठी झायराला 2016 साली राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 'बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस'चा पुरस्कार तिला मिळाला होता. या सिनेमात झायराने पैलवान गीता फोगटची भूमिका निभावली होती.


दंगल सिनेमानंतर 2017 मध्ये झायरा 'सिक्रेट सुपरस्टार' सिनेमातून पुन्हा आमिर खानसोबत रुपेरी पडद्यावर झळकली होती. या सिनेमासाठी झायराला फिल्मफेअरचा 'बेस्ट अॅक्ट्रेस क्रिटिक' पुरस्कार मिळाला होता.


VIDEO | राज्यातील बातम्या सुपरफास्ट