मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हं आहेत. मध्य प्रदेशमध्ये 'दबंग 3' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शिवलिंग लाकडी वेष्टनाने झाकल्याचे फोटो सोशल मीडियवर वायरल झाले. त्यानंतर भाजपने सलमानवर हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी हल्लाबोल केला आहे.

मध्य प्रदेशातील महेश्वर या धार्मिक स्थळावर सलमानच्या 'दबंग 3' चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. नर्मदा नदीच्या तीरावर सिनेमाचा सेट बांधण्यात आला आहे. शिवलिंगाचं संरक्षण करणं आणि त्याचं पावित्र्य राखणं, या हेतूने लाकडी वेष्टनाने झाकल्याचा दावा सलमानने केला आहे.

झाकलेल्या शिवलिंगाचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशातील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्षातील भाजपमध्ये वाक्-युद्ध रंगलं. कमलनाथ सरकारमध्ये वारंवार हिंदूंच्या भावना दुखावण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांनी केला.


भगवान शंकराविषयी अनादर व्यक्त केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्याची मागणी भाजपने केली आहे. काँग्रेसने मात्र भाजपच्या संकुचित मानसिकतेवर बोट ठेवलं आहे.

सलमानने काही दिवसांपूर्वीच दबंग 3 च्या शूटिंगला सुरुवात केली. तर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने कालपासून चित्रीकरण सुरु केलं.