मुंबई : 'घर से निकलते ही...' या गाण्यातली अभिनेत्री तुमच्या स्मरणात आहे का? पापा कहते है, होगी प्यार की जीत यासारख्या चित्रपटातील अभिनेत्री मयुरी कांगो 'गुगल इंडिया'मध्ये रुजू झाली आहे. अभिनयातून संन्यास घेतल्यानंतर मयुरीने वेगळी वाट चोखंदळली.

मयुरीने 'नसीम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. नव्वदच्या दशकात 'पापा कहते है' चित्रपटात जुगल हंसराज आणि मयुरी कांगो या जोडीवरचं 'घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही, रस्ते में है उनका घर' हे गाणं चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर मयुरीने होगी प्यार की जीत, बादल सारख्या मोजक्या चित्रपटात काम केलं.

चित्रपटांनंतर मयुरी ही 'नरगिस', 'थोडी खुशी थोडा गम', 'डॉलर बहू', 'किटी पार्टी' यासारख्या मालिकांमध्ये झळकली. मात्र अभिनय क्षेत्रात बस्तान बसवता न आल्याने तिने क्षेत्र बदललं. 2003 मध्ये मयुरी एनआरआय आदित्य धिल्लनसोबत विवाहबंधनात अडकली. त्यानंतर तिने अमेरिकेची वाट धरली.

मयुरीने अमेरिकेतून मार्केटिंग आणि फायनान्स विषयात एमबीएची पदवी घेतली. मयुरी आता 'गुगल इंडिया'च्या इंडस्ट्री-एजन्सी पार्टनरशिप विभागाची प्रमुख झाली आहे. मयुरी याआधी Performix Resultrix या डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये कार्यरत होती. तिने नेस्ले, उबर आणि एअरटेलसारख्या कंपन्यांमध्येही काम केलं आहे.

खरंतर शिक्षण सुरु असताना मयुरीची निवड आयआयटी कानपूरमध्ये झाली होती, मात्र चित्रपटांसाठी तिने प्रवेश घेतला नाही. मयुरी ही ज्येष्ठ मार्क्सवादी नेते भालचंद्र कांगो यांची कन्या आहे. मयुरी-आदित्य यांना आठ वर्षांचा कियान हा मुलगा आहे.