मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. सिनेमागृहात बाळासाहेबांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहताना मराठमोळा 'शिववडा' चाखण्याची संधीही तुम्हाला मिळणार आहे. सत्तर रुपयांना दोन वडापाव खाता येतील.

मुंबईकरांच्या जीवनात वडापावला विशेष महत्त्व आहे. कधीही, कुठेही अत्यल्प किमतीत उपलब्ध होणारा वडापाव मुंबईकरांचा लाडका आहे. तिखट-गोड चटणी लावलेल्या पावात गरमागरम वडा भरला, की खिशाला चाट न लागता हा रुचकर पदार्थ खाता येतो. म्हणूनच 'ठाकरे' सिनेमाच्या प्रेक्षकांना पॉपकॉर्न ऐवजी शिवसेनेच्या 'शिववडा'चा पर्याय देण्यात येणार आहे. कार्निव्हल सिनेमाच्या 72 चित्रपटगृहांमध्ये यासाठी विशेष मेन्यू तयार करण्यात आला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि कार्निव्हल मोशन पिक्सर्च निर्मित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. नवाझुद्दीन सिद्दीकी या सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत असून मराठी भाषेसाठी अभिनेते सचिन खेडेकर यांनी आवाज दिला आहे. तर अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.



ठाकरे सिनेमाचे म्युझिक लाँच 12 जानेवारीला मुंबईत एका शानदार सोहळ्यात केले जाणार आहे. या चित्रपटाला आघाडीचे संगीतकार रोहन-रोहन यांनी संगीत दिले आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांतील गाण्यांचं लाँचिंग एकत्रच होईल. हिंदी भाषेतील गाणे प्रसिद्ध पार्श्वगायक सुखविंदर सिंग यांनी तर मराठीतील गाणे हरहुन्नरी गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी गायलं आहे.