मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राजकारण होत असल्यानं शिवसेनेवर विरोधी पक्षाची आगपाखड होताना दिसत होती. आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून या प्रकरणावर रोखठोक भूमिका मांडली आहे. यामध्ये केद्र, सीबीआय आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतलाय. मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेनं जात असल्यानं काही मोठे उलगडे होतील या हेतूनं त्यांना तपास करू दिला जात नसल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय.


काय म्हणाले संजय राऊत?


सुशांत सिंह राजपूत आणि त्याचं वडिलाचं पटत नव्हतं,
सुशांत सिंह किती वेळा त्याच्या वडिलांना भेटायला गेला?
असे अनेक प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.


महाराष्ट्र हे दऱ्या खोऱ्यांचं राज्य आहे, त्यामुळे या प्रकरणाला कोणीही कसंही वळण दिलं तरी आम्हाला नागमोडी वळणं माहित असल्याचं पलटवार संजय राऊत यांनी केलाय. शिवसेनेवर या प्रकरणात अनेकांनी आरोप केले. शिवसेनेच्या एका युवा मंत्र्याचं वारंवार नाव घेतलं गेलं त्यामुळे जे राजकारण सुरु आहे ते घृणास्पद असल्याचं सांगायला राऊत विसरले नाहीत. मुंबई पोलिसांनी तपास करावा, तो पूर्ण झाल्यावर ज्याला काही बोलायचं आहे ते बोलावं पण काही तपास होण्याआधी ज्या घडामोडी सुरु आहेत, त्या आश्चर्यकारक आहेत. कारण या प्रकरणाचा पाटणामध्ये गु्न्हा दाखल होतो, बिहारचे मुख्यमंत्रीमध्ये पडतात, बिहारच्या विधानसभेत प्रस्ताव मंजूर केला जातो. महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता सगळं सुरु असल्यानं या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं राऊत म्हणालेत. सत्य बाहेर येऊ नये यासाठी पडद्यामागून कोणीतरी हालचाली करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.


रोखठोकमध्ये काय लिहिलंय?


एक सुशांत; बाकी अशांत! एका आत्महत्येचे राजकारण!
या शीर्षकाखाली संजय राऊत यांनी रोखठोक लिहिलं आहे.
त्यातील प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणे




  • मुंबई पोलिसांचा तपास सुरू असताना बिहार सरकार सीबीआय चौकशीची मागणी करते, केंद्र सरकार त्यास लगेच मान्यता देते. एखाद्या प्रकरणाचे राजकारण करायचे, त्यासाठी सीबीआय, ईडीसारख्या केंद्रीय संस्थांचा वापर करायचा हे सर्व धक्कादायक आहे.

  • मुंबई पोलिसांना तपास जमणार नाही. त्यामुळे तो 'सीबीआय'कडे द्या, अशी मागणी बिहारच्या सरकारने केली व 24 तासांत ती मागणी मान्यदेखील झाली.

  • सुशांत प्रकरणाची 'पटकथा' जणू आधीच लिहिली गेली होती. पडद्यामागे बरेच काही घडले असावे, पण जे घडले त्याचे एका वाक्यात सार सांगावे तर, 'महाराष्ट्राविरुद्धचे कारस्थान' असेच सांगावे लागेल.

  • मुंबई पोलिसांनीच 26-11 चा दहशतवादी हल्ला परतवून लावला व भक्कम पुरावे उभे करून कसाबला फासावर लटकवले. त्यामुळे सुशांतसारख्या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करणे हा मुंबई पोलिसांचा अपमान आहे.

  • सर्वोच्च न्यायालयापासून ईडी, सीबीआयसारख्या संस्थांवर गेल्या काही वर्षांत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. असे प्रश्न निर्माण करणाऱ्यांत नरेंद्र मोदी व अमित शहासुद्धा होतेच!

  • महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. ते कसेही करून पाडायचे. पडत नाही म्हटल्यावर बदनाम करायचे असे विरोधकांनी ठरवले व भारतीय जनता पक्षाच्या सर्वच प्रकारच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या वृत्तवाहिनीतून त्यांनी सुशांत प्रकरणात आघाडी उघडली.

  • सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते.


या सर्व प्रकरणाचे सरळ सरळ राजकारण सुरू आहे व शोकांतिकेतली काही पात्रे आपापल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


पण राजकीय चष्म्यातून त्याकडे पाहणे योग्य नाही. त्याने आपले आयुष्यच संपवले. आता त्याच्या मृत्यूचा उपयोग भांडवल म्हणून कुणीही करावा याला काय अर्थ आहे!


Sanjay Raut PC | सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा वापर राजकीय फायद्या तोट्यासाठी : संजय राऊत