मुंबई : दिशा सॅलियनच्या मृत्यूपूर्वीचा अखेरचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिशा मित्रांसोबत नाचताना, आनंदी दिसत होती. पण अचानक असे काय घडले ज्याने दिशाला आत्महत्या करण्यास भाग पाडले. त्या रात्रीचे संपूर्ण सत्य नेमकं काय आहे हे एबीपी माझाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 8 तारखेला रात्री दिशा आणि रोहनच्या घरी दिशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत रोहन आणि त्याचे मित्र हिमांशू, दीप, इंद्रनील आणि रेशे या उपस्थित होते. याशिवाय व्हिडिओमध्ये इतर कोणीही दिसत नाही.
दिशाच्या मृत्यूपूर्वीचा हा व्हिडिओ रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आहे. यानंतर, दिशा खूप भावनिक होऊ लागली. रात्री 11.45 वाजता दिशाने लंडनमध्ये राहणारी तिची मैत्रिण अंकिताला व्हिडिओ कॉल केला. आणि या कॉलमधील संभाषणातच दिशाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होतं. दिशा सर्वात जवळची मैत्रिण अंकितानं दिलेल्या माहितीत दिशाच्या मृत्यूमागचे खरे कारण समोर आले आहे, जे सर्व निराधार बातम्यांना उत्तर देते.
अंकिताच्या माहितीनुसार, त्या रात्री मला दिशाचा व्हिडिओ कॉल आला होता. कॉलवर दिशाने रडण्यास सुरुवात केली. कारण दिशा दोन मोठ्या डील, विवो मोबाईल कंपनी आणि क्यूर फ़ीट जिम पूर्ण करू शकली नव्हती. मिलिंद सोमण यांनी विवो मोबाईल अॅडवर काम केले पण काही दिवसांनी ट्विटरवर त्यांनी चिनी उत्पादनावर बंदी घालण्याचे आवाहन केले. ज्यामुळे विवो कंपनी संतापली. दिशा कंपनीला समजावण्याचा प्रयत्न करत होती पण तिला त्यात यश मिळू शकले नाही. दुसरीकडे, दिशा पटानीला क्यूर फिट जिमसाठी साइन केले होते आणि नंतर कंपनीने दिशा पटानी यांना नकार दिला. हा करार देखील पूर्ण होऊ शकला नाही.
दिशा सॅलियन असा विचार करू लागली होती की लोक तिला मूर्ख समजतात आणि ती कोणतं काम करण्यात सक्षम नाही, अस लोकांना वाटतं. ती निराश झाली होती. दुसरीकडे, कौटुंबिक कारणांमुळे देखील दिशा दुःखी होती. दिशा माझ्याशी बोलत होती की तोपर्यंत रेषा आणि हिमांशू बेडरूममध्ये आले आणि माझ्याशी व्हिडिओ कॉलवर बोलू लागले. पण कॉल मध्यभागी कट झाला. मी पुन्हा कॉल केला तेव्हा दीपने कॉल घेतला आणि ते लोक जेवत आहेत असं सांगितलं आणि मग मी व्हिडिओ कॉलवर रोहनशी बोलू लागले. थोड्या वेळाने हिमांशु मोबाईल समोर आला आणि मला सांगितले की दिशा दुसर्या बेडरूममध्ये रडत आहे. त्याने मला सांगितले की दिशाला शांत केल्यानंतर फोन करेल. लंडनच्या वेळेनुसार दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे सात वाजता दीपने मला फोन केला आणि दिशाने आत्महत्या केल्याची मला माहिती दिली, असं अंकिताने सांगितलं. मला कुणावरही शंका नाही आणि त्या रात्री दिशा खूप निराश झाली होती, त्यामुळे कदाचित दिशाने असे पाऊल उचलले असेल, असंही अंकिताने सांगितलं.
दिशाच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले
दिशाच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्या रात्री पार्टीसंदर्भात अनेक प्रश्न मांडले गेले. असे म्हटलं जात होत की त्या रात्री एका पक्षाचे एक मोठे मंत्री आणि नेते उपस्थित होते. त्यांचा बचाव करण्यासाठी दिशाच्या हत्येला आत्महत्या असे संबोधले जात होते. पण व्हिडिओत हे देखील स्पष्टपणे दिसून आले आहे की त्या रात्री दिशा आणि तिच्या मित्रांशिवाय दुसरं कुणीही नव्हतं. त्याचबरोबर पोस्टमॉर्टम अहवालात हे स्पष्टपणे लिहिले आहे की दिशावर बलात्कार झाला नव्हता व दिशा गर्भवतीही नव्हती. तर आता प्रश्न पडतो की सोशल मीडियावर दिशाच्या मृत्यूबद्दल प्रश्न कोण आणि का उपस्थित करतायत. कोणत्या माहितीच्या आधारे दिशाची हत्या केली गेली असे म्हंटलं जात आहे? आणि सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा संबंध का जोडला जात आहे?