मुंबई/शिर्डी : विनोदी अभिनेता कपिल शर्मा गर्लफ्रेण्डसोबत शिर्डीत साईबाबांच्या चरणी लीन झाला. आगामी 'फितुर' चित्रपटाच्या रीलिजच्या तोंडावर कपिलने साईंचं दर्शन घेतलं.
गर्लफ्रेण्ड गिन्नी चतरथसोबत कपिलने शिर्डीला हजेरी लावली. कपिल-गिन्नीच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या असताना दोघांना एकत्र पाहणं त्यांच्या चाहत्यांना सुखावून गेलं. सोबत फिरंगी चित्रपटाचा दिग्दर्शक राजीव धिंग्राही होता.
बालमैत्रिण गिन्नीच्या प्रेमात असल्याची कबुली कपिलने मार्च महिन्यात दिली होती. मात्र त्यानंतर दोघंही फारसे एकत्र दिसले नव्हते. त्यातच कपिल-गिन्नीचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना ऊत आला. मीडियाने कपिलला त्याबाबत छेडल्यावरही त्याने मौन बाळगलं होतं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
'किस किस को प्यार करु' हा कपिल शर्माचा पहिला चित्रपट 2015 मध्ये रीलिज झाला होता. फिरंगीच्या निमित्ताने कपिल अभिनय आणि निर्मिती अशी दुहेरी भूमिका पेलणार आहे.
कपिलचा कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो प्रचंड गाजला होता. कलर्सवरील हा कार्यक्रम त्यानंतर द कपिल शर्मा शो या नावाने सोनी वाहिनीवर शिफ्ट झाला. मात्र त्यातच कपिलने ओढावून घेतलेले वाद आणि प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ यामुळे अल्पावधीतच या शोचाही गाशा गुंडाळावा लागला होता.