Shilpa Shetty Raj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा ( Raj Kundra) या दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एका सराफा व्यापाऱ्याने सोनं गुंतवणूक योजनेत शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि अन्य लोकांनी फसवणूक केली असल्याची सांगत कोर्टात धाव घेतली. त्यानंतर शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयाने सांगितले की, शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.त्यानंतर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एनपी मेहता यांनी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) यांना सराफा व्यापारी पृथ्वीराज सरेमल कोठारी यांच्या तक्रारीत केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय, न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जर तपासानंतर आरोप खरे सिद्ध झाले तर पोलिसांनी या प्रकरणी आयपीसीच्या सर्व आवश्यक कलमांतर्गत एफआयआर नोंदवावा असेही कोर्टाने निर्देश देताना म्हटले आहे.
2014 मध्ये सुरू केली होती गुंतवणूक योजना
पृथ्वीराज कोठारी यांनी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कुंद्रा दाम्पत्याने 2014 मध्ये एक योजना सुरू केली होती. यामध्ये गुंतवणूकदारांसाठी एक योजना होती की अर्ज करताना त्यांना सवलतीच्या दराने सोन्याचे आगाऊ पैसे भरण्यास सांगितले जायचे आणि त्यानंतर गुंतवणूक योजनेची मुदत पूर्ण झाल्यानंतर ठरलेल्या किमतीचे सोने दिले जाणार होते.
आश्वासनानुसार मिळाले नाही सोनं
आरोपींनी केलेल्या दाव्याच्या आधारे, कोठारी यांनी 2 एप्रिल 2019 रोजी आपल्याला 5,000 ग्रॅम 24 कॅरेट सोने दिले जाईल या विश्वासावर पंचवार्षिक योजनेअंतर्गत 90 लाख 38 हजार 600 रुपये गुंतवले. मात्र, कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार ठरलेले सोनं देण्यात आले नाही. तक्रारीत म्हटले की, आरोपींनी एक प्रकारे बोगस गुंतवणूक योजना आखून फसवणुकीचा कट आखला.
दरम्यान, राज कुंद्रा यांच्याविरोधात याआधीच ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू आहे. ईडीने काही स्थावर मालमत्ताही जप्त केली आहे. तर, अॅडल्ट फिल्म प्रकरणीही राज कुंद्राविरोधात आरोप आहेत. राज कुंद्रा सध्या जामिनावर आहे.