Sharda Sinha Passes Away: बिहारच्या लोकगायिका शारदा सिन्हा (Sharda Sinha) यांचं निधन झालं असून त्यांची कॅन्सरशी (Cancer) झुंज अपयशी ठरली आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शारदा सिन्हा दीर्घकाळापासून आजारी होत्या, त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शारदा सिन्हा यांचा मुलगा अंशुमन सिन्हा यांनी त्यांच्या आईच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करून निधनाची माहिती दिली. शारदा सिन्हा यांचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं की, "तुमच्या प्रार्थना आणि प्रेम नेहमीच आईसोबत असेल. छठी मैयानं आईला स्वतःकडे बोलावलं आहे. आई आता शारीरिकदृष्ट्या आपल्यात नाही.
अंशुमन यांनी दिलेली हेल्थ अपडेट
दरम्यान, शारदा सिन्हा यांचा मुलगा अंशुमन यांनी यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरुन आईच्या तब्येतीबाबत सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, शारदा सिन्हा यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. अंशुमन यांनी चाहत्यांना शारदा सिंह यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं होतं.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शारदा सिन्हा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी दिवंगत गायिकेसोबतचा एक फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.
अनेक कलाकारांनीही वाहिली श्रद्धांजली
शारदा सिन्हा यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीतही शोक व्यक्त होत आहे. कुमार विश्वास यांनी शारदा सिन्हा यांचे फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पतीच्या निधनाचा बसलेला खूप मोठा धक्का
यावर्षी 21 सप्टेंबर रोजी शारदा सिन्हा यांचे पती ब्रज किशोर यांचं वयाच्या 80 व्या वर्षी ब्रेम हॅमरेजनं निधन झालेलं. वडिलांच्या निधनानं आई शारदा सिन्हा यांना खूप मोठा धक्का बसल्याचं मुलगा अंशुमन यानं सांगितलं. त्यानंतर शारदा यांची प्रकृती खूपच खालावू लागली.
शारदा सिन्हा छठ गाण्यांसाठी ओळखल्या जायच्या
बिहार कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारदा छठ गाण्यांसाठी प्रसिद्ध होत्या. OTT मालिका 'महाराणी सीझन 2' मधील निर्मोह्या गाण्याला त्यांनी आपला आवाज दिला होता. शारदा सिन्हा यांनी 1989 मध्ये आलेल्या सलमान खान आणि भाग्यश्री स्टारर सुपरहिट चित्रपट 'मैंने प्यार किया' मध्ये 'काहे तोसे सजना' हे गाणं देखील गायलं होतं, जे खूप लोकप्रिय झालं होतं. 'गॅग्स ऑफ वासेपूर 2' मधील 'तार बिजली से पटले हमारे पिया' यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांना त्यांनी आपला आवाज दिला आणि आपली छाप पाडली.