“उन्नई कान्नधू नान इंद्रू नाल इल्लये” हे तो गात असलेलं गाणं कमल हसनच्या विश्वरुपम सिनेमातलं आहे आणि गाण्याचा मूळ गायक स्वत: शंकर महादेवन आहेत. हा व्हायरल व्हिडिओ शंकरने ऐकला, त्याच्या आवाजाने भारावलेल्या शंकरने या माणसाला शोधायचं ठरवलं, त्याने फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटरवर हा व्हिडिओ टाकला.
आपल्या पोस्टमध्ये शंकर महादेवन म्हणतात, “याला म्हणतात घामाचं, श्रमाचं फळं...हे सूर जिथे जन्म घेतात त्या आपल्या देशाचा आपल्या संस्कृतीचा खूप अभिमान वाटतो. कोण आहे हा माणूस? मी याच्यापर्यंत कसा पोहोचू? मला याच्यासोबत काम करायला आवडेल, त्याला शोधायला माझी मदत करा.”
पोस्टनंतर 24 तासात शंकर महादेवन, त्या आवाजाच्या गायकापर्यंत पोहोचलेही. त्याचं नाव राकेश उन्नी, राकेश केरळातील अलप्पी जवळच्या नुरानाडू गावचा..
रबर शेतीत रोजंदारीवर तो काम करतो, रबर कट करायचं, ते खांद्यावर वाहून न्यायचं आणि ट्रकमध्ये लोड करायचं हे त्याचं रोजचं काम. त्याने गाण्याचं कोणतंही शिक्षण घेतलं नव्हतं हे विशेष. तिथल्या गावात गायन स्पर्धेत, मेळ्यांमध्ये तो नियमित गातो.
शुक्रवारी रबर कटिंगच्या कामातून थोडी उसंत मिळाली तेव्हा तो गाऊ लागला, त्याचा ट्रक ड्रायव्हर मित्र शमीरने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला.. नंतर त्याची बहीण शमीलाने हा व्हिडिओ अपलोड केला.. अल्पावधीतच तो जगभरात व्हायरल झाला आणि मूळ गायक शंकर महादेवनपर्यंत पोहोचला, शंकरने ट्वीट, फेसबुक केल्यानंतर राकेशचं नशीबच फळफळलं.
शंकर महादेवन यांनी राकेशचा नंबर मिळवला आणि त्याला कॉल केला, आपला आवाज खूप छान असल्याचं शंकर महादेवन यांनी सांगितलं तो क्षण कधीच विसरु शकत नाही असं राकेश सांगतो.
“मला तुम्हाला एकदा भेटायची इच्छा आहे असं सांगितल्यावर फक्त भेटणारच नाही तर आपण दोघं एकत्र गाणार सुद्धा आहोत” असं शंकर महादेवनने राकेशला सांगितलंय.
फक्त शंकरचं नाही तर इतर अनेक गायक संगीतकारांनीही राकेशला कॉल करुन शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियाचा चांगला वापर करता येऊ शकतो याचं हे उदाहरण आहे.
पाहा व्हिडीओ :