Shankar Mahadevan Majha Katta : एबीपी माझाच्या 'माझा महाकट्टा' (Majha Katta) या कार्यक्रमात शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांच्यासोबत गप्पांची अनोखी मैफिल रंगली. 'कट्यार' सिनेमा करण्यासाठी शंकर महादेवन यांनी आधी नकार दिला होता. पण सुबोध भावेने (Subodh Bhave) समजूत घातल्यानंतर त्यांनी हा सिनेमा बनवण्याचं ठरवलं आणि 'सूर निरागस हो' (Sur Niragas Ho) हे गाणं रेकॉर्ड झालं. 


'कट्यार'च्या अनुभवाबद्दल बोलताना शंकर महादेवन म्हणाले की,"सुबोध भावेने मला 'कट्यार काळजात घुसली' (Katyar Kaljat Ghusali) या सिनेमाबद्दल माहिती दिली. त्यावेळी मी त्याला म्हणालो की,"एक ताजमहाल आधीपासूनच आहे. आता त्याच्या बाजूला आणखी एक ताजमहाल बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. आमच्यात खूप चर्चा झाली. त्यानंतर मी या सिनेमासाठी होकार दिला आणि 'सूर निरागस हो' हे पहिलं गाणं रेकॉर्ड केलं. पुढे या सिनेमातील सर्वच गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. हा सिनेमा करण्यासाठी सुबोधने खूप मदत केली". 


शंकर महादेवन यांचा संगीतप्रवास अनेकांना माहिती आहे. पण सिद्धार्थला (Siddharth Mahadevan) संगीताची गोडी कशी लागली? याबद्दल बोलताना शंकर महादेवन म्हणाले,"मुलांना ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे. त्यांना त्या क्षेत्रात काम करण्याची मुभा होती. पण त्यांना संगीताची ओढ लागली. सिद्धार्थचा संगीतक्षेत्रातील प्रवास सोपा नक्कीच नाही. या क्षेत्रातील त्याचा प्रवास खडतर आहे. शंकर महादेवनचा मुलगा असल्यामुळे सिद्धार्थला काम मिळालेलं नाही तर त्याच्याकडे ते टॅलेंट आहे".


सिद्धार्थ महादेवनचा संगीतप्रवास...


सिद्धार्थच्या प्रवासाबद्दल बोलताना शंकर पुढे म्हणाले,"आयुष्यात शिक्षण महत्त्वाचं आहे, हे मला माहिती होतं. शिकलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही. मुलांनीदेखील ही बाब लक्षात घेत आधी शिक्षण पूर्ण केलं. सोपं काही काही परिश्रम घ्यावेच लागतात हे त्यांनी अनुभवलं. शिक्षण आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींची सांगड मुलांनी घातली आहे. आज मी माझ्या दोन्ही मुलांसोबत स्क्रीन शेअर करू शकतो, याचा मला अभिमान आहे". 


संगीतक्षेत्रातील प्रवासाबद्दल सिद्धार्थ म्हणाला,"घरी लहानपणापासून संगीताचं वातावरण होतं. अनेक दिग्गज मंडळींची घरी उठ-बस होत असे. हळूहळू संगीताची ओढ निर्माण झाली. वयाच्या तिसऱ्या वर्षी 'ब्रेथलेस' या अल्बमधील एका गाण्याचं पहिल्यांदा रेकॉर्डिंग केलं. संगीतक्षेत्रात करिअर करायचं हे मी ठरवलं होतं. पण गायक, ड्रमर की संगीत दिग्दर्शक व्हायचं हे मला कळत नव्हतं. वयाच्या 16 व्या वर्षी मराठी सिनेमांसाठी काम करायला सुरुवात केली". 


सिद्धार्थ पुढे म्हणाला,"संगीत क्षेत्रात करिअर करायचं ठरवल्यानंतर मी परदेशात जाऊन या क्षेत्रात शिक्षण घेतलं. सुरुवातीला स्टुडिओमध्ये जाऊन मी फक्त निरिक्षण घेत असे. त्यादरम्यान मला अनेक गोष्टी शिकता आल्या. कौतुक करणारे खूप आहेत. पण बाबा मला खरी प्रतिक्रिया देतात. मला वेगवेगळ्या जॉनरची गाणी आवडतात". 


शंकर महादेवन यांनी बॉलिवूडच्या झगमगाटात राहून मुलांना शिकवण कशी दिली?


बॉलिवूडच्या झगमगाटात राहून मुलांना शिकवण कशी दिली याबद्दल बोलताना शंकर महादेवन म्हणाले की,"एक चांगला माणूस उत्कृष्ट संगीतकार होऊ शकतो, असं मला वाटतं. गर्विष्ट माणसांसोबत काम करायला मला आवडत नाही. मुलांवरदेखील मी हेच संस्कार केले आहेत. सिद्धार्थने एका फॅशन शोसाठी पहिलं गाणं रेकॉर्ड केलं. 'झाले गेले' असे या गाण्याचे नाव आहे. सिद्धार्थचं हे गाणं माझं आवडतं गाणंदेखील आहे. ही माझी कॉलरट्यूनदेखील होती". 


आयुष्यात काय नाही करायचं हे मी खळे काकांकडून शिकलो : शंकर महादेवन


खळे काकांबद्दल बोलताना शंकर महादेवन म्हणाले,"आयुष्यात काय नाही करायचं हे मी खळे काकांकडून शिकलो आहे. खळे काकांची आठ ते नऊ गाणी मी रेकॉर्ड केली आहेत. लवकरच ही प्रेक्षकांच्या भेटीला येतील. खळे काकांचा सूरांचा प्रवास खूप खास आहे. मला वाटतं गुरु-शिष्याचं नातं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या काळात हे रुप बदललं आहे. शिकण्याचं माध्यम बदललं आहे". 


संबंधित बातम्या


Majha Katta: लग्न करायचं होत आचाऱ्याशी झालं राज ठाकरेंशी, काय आहे शर्मिला ठाकरेंच्या लग्नाचा किस्सा?