मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. श्रद्धा कपूर 2020 मध्ये प्रियकर रोहन श्रेष्ठासोबत लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.


आयएएनएस या वृत्तसंस्थेने श्रद्धा कपूर यांचे वडील अभिनेते शक्ती कपूर यांच्याशी याबाबत बातचित केली. श्रद्धाच्या लग्नाविषयीच्या बातम्यांचं शक्ती कपूर यांनी खंडन केलं आहे. खरंच, माझी मुलगी लग्न करत आहे? कृपया मला आमंत्रण द्यायला विसरु नका, असंही हसत शक्ती कपूर यांनी म्हटलं.





श्रद्धाचं लग्न कुठे होईल हे पण मला सांगा, म्हणजे मी तेथे पोहचेन. श्रद्धा माझी मुलगी आहे, तरीही ती लग्न करत आहे, याची मला माहिती नाही. त्यामुळे कृपया मला सांगा, असं शक्ती कपूर यांना गमतीत म्हटलं. एका वृत्तपत्रात श्रद्धाच्या लग्नाची बातमी छापून आल्यानंतर ती व्हायरल झाली होती.


श्रद्धा आणि तिचा प्रियकर रोहन लग्न करण्यासाठी तयार असल्याचं या बातमीत सांगण्यात आलं होतं. श्रद्धा आणि रोहन एकमेकांना दोन वर्षांपासून डेट करत असल्याचंही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र अजून 4-5 वर्ष श्रद्धाचा लग्न करण्याचा विचार नसल्याचं शक्ती कपूर यांनी सांगितलं आहे.


याआधी श्रद्धा कपूरचं नाव काही अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं होतं. आशिकी-2 मधील अभिनेता आदित्य रॉय कपूर सोबत श्रद्धाच्या अफेयरची चर्चा रंगली होती. त्यानंतर फरहान अख्तर सोबतही श्रद्धाचं नाव जोडलं गेलं. श्रद्धा फरहान अख्तरसोबतच राहत असल्याचीही अफवा पसरली होती.