मुंबई : शाहीद कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'कबीर सिंग' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. वीस दिवसांमध्ये 'कबीर सिंग'ने 246.28 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यासोबतच विकी कौशलच्या 'उरी' चित्रपटाचा विक्रम मोडित काढत 'कबीर सिंग' हा 2019 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.


शाहीदसह कियारा अडवाणी, सुरेश ओबेरॉय, निकिता दत्ता, अर्जन बाजवा, कामिनी कौशल यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने बुधवारी, म्हणजेच विसाव्या दिवशी 3.11 कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट अडीचशे कोटींचा टप्पा पार करणं निश्चित मानलं जात आहे. चित्रपट व्यवसाय अभ्यासक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.


जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'उरी' चित्रपटाने भारतातील 244.36 कोटींसह जगभरात 342 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2019 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सलमान खानचा भारत (211 कोटी), चौथ्या क्रमांकावर अक्षयकुमारचा केसरी (154.41 कोटी), तर पाचव्या क्रमांकावर अजय-माधुरी यांचा टोटल धमाल (154.23 कोटी) हे चित्रपट आहेत.


कबीर सिंगने विक्रमी कमाई केल्यानंतर शाहीद कपूरने इन्स्टाग्राम पोस्ट लिहून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. या सिनेमाच्या यशानंतर शाहीदने आपल्या मानधनातही घसघशीत वाढ केली आहे. तो आता 35 कोटी रुपये फी आकारणार असल्याचं म्हटलं जातं.

संदीप रेड्डी वनगा दिग्दर्शित 'कबीर सिंग' चित्रपट हा अल्लू अर्जुन या दाक्षिणात्य चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे.