Shaitaan Advance Booking Day 1: अभिनेत्री यामी गौतमच्या 'आर्टिकल 370' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे.  या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर  आपल्या बजेटच्या तीन पट कमाई केली. आता या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या 'शैतान' या (Shaitaan Movie) चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. अजय देवगण (Ajay Devgan), ज्योतिका (Jyothika) आणि आर. माधवन (R. Madhavan) यांची प्रमुख भूमिका असलेला 'शैतान' चित्रपटाची सिनेरसिकांना प्रतिक्षा लागली आहे. या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. शैतान चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 


 






अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा प्रतिसाद किती?


शैतानचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. यापूर्वी, चित्रपटासाठी प्री-तिकीट बुकिंग मर्यादित ठिकाणी उघडण्यात आले होते, परंतु अलीकडे ऑनलाइन तिकीट-बुकिंग प्लॅटफॉर्मवर आणखी काही शो जोडले गेले आहेत. पहिल्या दिवसाच्या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगचे आकडेही आले आहेत. SACNILC च्या रिपोर्टनुसार, पहिल्याच दिवशी देशभरात  हिंदी 2 डी फॉर्मेटमध्ये शैतानची 15 हजार तिकिटांची बुकिंग झाली आहे. त्यातच चित्रपटाने 37.41 लाख रुपयांची कमाई केली आहे. सध्या चित्रपट प्रदर्शित होण्यास काही दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे प्रदर्शित होईपर्यंत चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळणार असल्याची शक्यता आहे. 


'शैतान'च्या  ट्रेलरला चांगला प्रतिसाद


'दृश्यम 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटानंतर अजय देवगण पुन्हा एकदा 'फॅमिली मॅन'च्या रुपात दिसणार आहे. तर,  आर. माधवन हा खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. हॉरर थ्रिलरपट असलेल्या शैतानच्या ट्रेलरला मोठा प्रतिसाद मिळाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. 






 शैतानची स्टारकास्ट कोणती?


शैतान चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. याआधी त्यांनी क्वीन आणि सुपर 30 सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. शैतानमध्ये अजय देवगण, ज्योतिका, आर. माधवन, जानकी बोदीवाला, अंगद राज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओ, पॅनोरमा स्टुडिओ आणि देवगन फिल्मस यांनी केले. येत्या 8 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.