मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’ आणि ‘पाँचवी पास’ या शोनंतर बॉलिवूडचा किंग शाहरुख पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येणार आहे. होस्टिंगमधून शाहरुखने आतापर्यंत नेहमीच चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आता ‘टेड’ (TED) टॉकमधून शाहरुख दिसणार आहे. ‘टेड टॉक : नई सोच’ असं शाहरुख होस्ट करणार असणाऱ्या शोचं नाव आहे.
टेड (TED) म्हणजे तंत्रज्ञान, मनोरंजन आणि डिझाईन. या शोच्या लॉन्चिंग डेटचा अद्याप खुलासा झालेला नाही. या शोबाबत सर्व माहिती गुपित ठेवण्यात आली आहे. मात्र, एक महिला आणि एक पुरुष स्पीकर पहिल्या एपिसोडमध्ये असतील.
‘टेड टॉक : नई सोच’ हा शो देशभरातील लोकांना प्रेरणादायी असेल. शोची कॉन्सेप्ट अत्यंत जवळची वाटते, असे शाहरुख खानने म्हटले आहे.
या शोमध्ये शाहरुख स्पीकर्सशी प्रेक्षखांना ओळख करुन देईल. शिवाय, शोदरम्यान शाहरुखची भूमिकाही महत्त्वाची असेल.
भारतीय वंशाचे सुगत मित्रा (2013) आणि राज पंजाबी (2017) हे आपल्या नव्या विचारांसाठी 10 लाख रुपयांचा वार्षिक टेड पुरस्कार जिंकला आहे. टेड शोच्या इंग्रजी व्हर्जनच्या स्पीकर्समध्ये बिल गेट्स, अल गोर, जेन गुडाल, सर रिचर्ड ब्रॅनसन, नंदन नीलेकणी इत्यादींनी सहभाग घेतला होता.