Shahrukh Khan First Movie with Manoj Bajpayee :   मागील काळात जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. तर, काही जुने चित्रपट हे तंत्रज्ञानाच्या मदतीने रिस्टोर करण्यात येत आहेत. त्यामुळेच प्रेक्षकांना जुन्या चित्रपटांचा आनंद चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतो. आता, बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा (Shahrukh Khan) जुना चित्रपट पुन्हा अशाच पद्धतीने रिलीज होणार आहे. या चित्रपटात मनोज वाजपेयीचीदेखील (Manoj Bajpayee) भूमिका आहे. 


फिल्म आर्काविस्ट  शिवेंद्रसिंग डुंगरपूर हे चित्रपट री-स्टोर करण्यासाठी ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी श्याम बेनेगल यांचा 'मंथन' चित्रपट पुन्हा री-स्टोर केला. 'मंथन' 1976 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये दाखवला जाणार आहे. हा महोत्सव 14 मेपासून सुरू होणार असून 25 मेपर्यंत चालणार आहे. 


'मंथन' नंतर, शिवेंद्र हे शाहरुख खान आणि मनोज वाजपेयी यांच्या टेलिव्हिजन चित्रपटाच्या री-स्टोरवर काम करत आहेत. In Which Annie Gives It Those Ones असे या चित्रपटाचे नाव आहे. एखाद्या चित्रपटाची मूळ प्रिंट हरवल्यानंतर री-स्टोर करता येते. या री-स्टोर प्रक्रियेत व्हिज्युअल क्वालिटीचा दर्जा चांगला करण्यात येतो.


'In Which Annie Gives It Those Ones' हा चित्रपट 1989 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटातून शाहरुख खानने पडद्यावर पदार्पण केले होते. रिलीज होणारा हा शाहरुखचा पहिला प्रोजेक्ट होता. 


चित्रपटाची मूळ प्रिंट हरवली... 


In Which Annie Gives It Those Ones चित्रपटाची मूळ प्रिंट हरवली आहे.  मात्र, ज्यावेळी फिल्म टीव्हीवर दाखवण्यात आली. तेव्हा काही लोकांनी  व्हिडीओ कॅसेटवर त्याचे रेकोर्डिंग केले. त्याशिवाय, काही VHS टेप्सवरही याचे रेकोर्डिंग उपलब्ध आहे. काही लोकांनी युट्युबवर ही फिल्म अपलोड केली. आता शिवेंद्र डूंगरपूर ही फिल्म री-स्टोर करत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चित्रपट पुन्हा एकदा रिलीज करण्यात येणार आहे. मात्र, ही फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार की थिएटरमध्ये रिलीज होणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 


अरुंधती रॉय यांची कथा


In Which Annie Gives It Those Ones  हा इंग्रजी भाषेतील टीव्ही चित्रपट आहे. अरुंधती रॉय यांची कथा आहे. प्रदीप कृष्णन यांनी दिग्दर्शन केले होते. प्रदीपच्या कारकिर्दीतील हा दुसरा चित्रपट होता. याआधी त्यांनी ‘मॅसी साहेब’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ज्यामध्ये रघुबीर यादव, बॅरी जॉन, अरुंधती रॉय आणि वीरेंद्र सक्सेना यांनी काम केले होते. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप प्रसिद्धी मिळाली. 


In Which Annie Gives It Those Ones चित्रपटाची कथा  1970 च्या दशकात बेतलेली आहे. हा चित्रपट आनंद ग्रोव्हर उर्फ ​​ॲनी, नवी दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरचा बंडखोर विद्यार्थी आहे. या चित्रपटात अर्जुन रैनाने ॲनी उर्फ ​​आनंद ग्रोव्हरची भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत रोशन सेठ, ऋतुराज सिंह, हिमानी शिवपुरी, अरुंधती रॉय, रघुबीर यादव, शाहरुख खान आणि मनोज वाजपेयी  यांच्या भूमिका आहेत.


शाहरुखचे पडद्यावर पदार्पण


या चित्रपटातील भूमिका ही शाहरुख खानच्या करिअरमधील पडद्यावरची पहिली भूमिका मानली जाते. या आधी त्याने लेख टंडनच्या 'दिल दरिया' या शोमध्ये काम केले होते. पण हा शो उशिराने रिलीज झाला. तोपर्यंत हा चित्रपट टीव्हीवर रिलीज झाला होता.  त्याच वर्षी शाहरुख 'फौजी'या मालिकेतही दिसू लागला होता. ही  मालिका 18 जानेवारी 1989 रोजी दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. 'फौजी'चे दिग्दर्शन लेफ्टनंट कर्नल राज कुमार कपूर यांनी केले होते.