'रईस'च्या प्रमोशनसाठीही माहिरा भारतात येणार नाही : राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम | 11 Dec 2016 08:02 PM (IST)
मुंबई : 'रईस' चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी अभिनेता शाहरुख खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यापुढे पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेणार नाही, असं शाहरुखनं सांगितल्याचं राज ठाकरे म्हणाले. तसंच जोपर्यंत दोन देशांचे संबंध सुधारणार नाहीत तोपर्यंत प्रमोशनसाठीही महिरा खान भारतात येणार नाही, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मनसेने उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना तीव्र विरोध केला होता. 'रईस' सिनेमातही पाकिस्तानी कलाकार माहिरा खान हिचा समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेसोबत चर्चा करण्यासाठी शाहरुख स्वतः पुढे आला आहे. यापूर्वी मनसेने करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमात पाकिस्तानी कलाकार फवाद खान याचा समावेश असल्यामुळे सिनेमाचं प्रदर्शन रोखण्याचा इशारा दिला होता. मात्र नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि निर्मात्यांच्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला. दरम्यान शाहरुख आणि राज ठाकरे यांच्या भेटीत 'रईस'च्या प्रदर्शनाबाबतच चर्चा होणार आहे. कारण शाहरुखने या सिनेमाची निर्मिती देखील केली आहे. त्यामुळे प्रदर्शनात अडथळा येऊ नये, यासाठी शाहरुख प्रयत्न करणार आहे. 'रईस' 25 जानेवारी 2017 ला रिलीज होणार आहे.