दिल्ली : देशभरातील चित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुरु  होण्याआधी राष्ट्रगीत वाजवलं जाणार आहे. मात्र अपंगांना यावेळी उभं राहण्यात सूट देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं राष्ट्रगीतासंबंधीच्या निर्णयात कोणताही मोठा बदल करण्यास नकार दिला आहे.


सुप्रीम कोर्टानं राष्ट्रगीतावेळी चित्रपटगृहाचे दरवाजे बंद ठेवण्याचाही आदेश दिला आहे. हा आदेश राष्ट्रगीतावेळी शांतता आणि शिस्त राखली जावी यासाठी दिल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रगीतावेळी प्रेक्षकांनी चित्रपटगृहातून बाहेर जाऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलं. मात्र दरवाजा बाहेरुन बंद करण्यास कोर्टानं सांगितलेलं नाही.

30 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टानं चित्रपटगृहात सिनेमा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवण्याचा आदेश दिला होता. कोर्टानं राष्ट्रगीतावेळी स्क्रीनवर तिरंगा दाखवला जावा असंही स्पष्ट केलं होतं. तसंच हॉलमध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना उभं राहणं सक्तीचं केलं होतं.

केरळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या आयोजकांनी या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. त्यांनी फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या 1500 परदेशी पाहूण्यांना या निर्णयातून सूट मिळावी अशी मागणी केली होती. मात्र परदेशी पाहुण्यांना भारताच्या सन्मानार्थ राष्ट्रगीतावेळी उभं राहण्यात कोणतीही अडचण नसावी असं म्हणत कोर्टानं याचिका फेटाळली आहे.

30 नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात सुप्रीम कोर्टानं व्यावसायिक फायद्यासाठी राष्ट्रगीताच्या वापरावर पूर्णपणे बंदी आणली आहे. तसंच राष्ट्रगीत 52 सेकंदांमध्येच वाजलं पाहिजे असंही कोर्टानं सांगितलं आहे. याप्रकरणी 14 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.