मुंबई : अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ या जोडीच्या अभिनयाने 1989 सुपर-डुपर हिट ठरलेल्या ‘राम लखन’ सिनेमाचा लवकरच रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेदिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टी या सिनेमाचा रिमेक बनवणार आहे. राम-लखनच्या भूमिकेत कोण असणार, याबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत. मात्र, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह हे दोघे राम-लखनच्या भूमिकेत असणार आहेत, अशी माहिती मिळते आहे. रणवीर या रिमेकमध्ये काम करणार हे अनेक दिवसांपासून म्हटलं जात होतं. मात्र, त्याच्या भावाच्या भूमिकेत कोण असेल, या रोहित शेट्टी विचारात होता. या सिनेमातील लखनच्या भूमिकेत रणवीर सिंह, तर रामच्या भूमिकेसाठई वरुण धवन आणि अर्जुन कपूर यांच्यात स्पर्धा होती. मात्र, रामच्या भूमिकेत शाहिद असेल, अशी माहिती मिळते आहे. राम-लखनचा शोध संपला असला, तरी माधुरी-डिम्पलने साकारलेल्या भूमिकांसाठी कोणत्या अभिनेत्रींची वर्णी लागणार, हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.