नवी दिल्ली : बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खानच्या सदिच्छादूतच्या निवडीवरुन वाद सुरु आहे. मात्र, ज्याप्रकारे सलमानच्या निवडीला विरोध होत आहे, त्याचवेळी बॉलिवूडमधून अनेकजण त्याच्या समर्थनसाठीही पुढे येत आहेत.   केंद्राने सलमानची निवड केल्यानंतर अनेकांनी विरोध केला. मात्र, आता बॉलिवूडमधील अनेकजण सलमानच्या समर्थनासाठी धावले आहेत. शिवाय, आता तर या वादात एका अशा व्यक्तीने एन्ट्री घेतली आहे, ज्याची सलमाननेही विचार केला नसेल.   सलमान खानची एक्स-गर्लफ्रेण्ड ऐश्वर्या राय आता सलमानच्या समर्थनासाठी पुढे आली आहे. रिओ ऑलिम्पिक सदिच्छादूतवरुन सुरु असलेल्या वादावर ऐश्वर्याला प्रश्न विचारल्यानंतर, ऐश्वर्या म्हणाली, “जर कोणतीही व्यक्ती देशासाठी काहीतरी चांगलं करत असेल आणि कुणाला देशाचं प्रतिनिधित्त्व करण्याची इच्छा असेल, मग ते खेळ, संगीत असो किंवा कला, अशा व्यक्तींचं स्वागतच करायला हवं.”   रिओ ऑलिम्पिकच्या सदिच्छादूतपदावरुन वाद सुरु झाल्यानंतर अजून स्वत: सलमान खानने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, बॉलिवूडमधून अनेकांनी त्याच्या या निवडीचं समर्थन केलं आहे.